News Flash

दुसऱ्या हरितक्रांतीसाठी..

सन १९६०च्या दशकात हरितक्रांतची सुरुवात झाली.

पहिली हरितक्रांती पूर्वजांनी जमीनीत मुदत ठेवीप्रमाणे सेंद्रीय कर्बाची पातळी स्थिर ठेवलेली होती म्हणून यशस्वी झाली असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. दुसऱ्या हरितक्रांतीसाठी जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जे हरितक्रांतीपूर्वी ४ टक्के होते ते आज ०.२ ते ०.५ पर्यंत खाली आले आहे ते १ टक्का विनाखर्चीक पुढे आणणे व स्थिर ठेवणे हे सध्या कृषी शास्त्रज्ञापुढील खरे आव्हान आहे. या बाबीकडे लक्ष केंद्रीत करून उपाय योजना न सुचविल्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेती व्यवसायापासून तरुण शेतकऱ्याचे दुरावण्याचे प्रमाण वाढत आहे.

सन १९६०च्या दशकात हरितक्रांतची सुरुवात झाली. तत्पूर्वी हजारो वर्षे भारतीय शेतकरी भूधारणा व पशुधन मोठया प्रमाणावर असल्यामुळे आणि शेतमजुराची क्रयशक्ती अधिक असल्यामुळे शेतीपिकाचे संगोपन कमी खर्चात करत होता आणि शेतमजूराच्या श्रमाच्या मोबदल्यात धान्य ही पंरपरा रुढ असल्यामुळे उत्पादन खर्च मर्यादीत ठेवणे शेतकऱ्याला शक्य होते. जसजसे अनुदानावर धान्य वितरण चालू झाले तसतसे शेतमजूर श्रमाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करू लागला. परिणामी शेतकरी नगदी पिकांकडे आकर्षित झाला. नगदी पिकांसाठी रासायनिक खते / औषधी व संकरीत बियाणे याचा वापर सुरू केला. पहिले २०-२५ वर्ष उत्पादनातील वाढ दिसून आली मात्र तदनंतर उत्पादन खर्चात वाढ व नगदी नफ्यातील घट ही बाब प्रकर्षांने पुढे आली आणि आज नफ्यातील घटीमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली.

उत्पादन खर्चात झालेली वाढ ही प्रामुख्याने शेती मधील सर्व निविष्ठा बाहेरून खरेदी करून वापराव्या लागत असल्यामुळे तसेच जमीनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण रासायनिक खताच्या तुलनेत सेंद्रीय खते परिस्थितीमुळे न वापरल्याने घटत गेल्याचे दिसून येते. दिलेल्या सेंद्रीय खतापेक्षा रा. खते उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी जिवाणूसाठी लागणारी उर्जा ही तीस पट अधिक लागते. त्या उर्जाचे स्त्रोत हे सेंद्रीय पदार्थापासून होणारा सेंद्रीय कर्ब असतो. परिस्थितीकीमुळे सेंद्रीय खत वापरण्यावर मर्यादा आल्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी कमी होऊन आज ते ०.२ ते ०.५ टक्क्यांवर आलेले आहे. परिणामी जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य उपलब्ध स्थितीत आणणारे तसेच अन्नद्रव्याचे स्थिरीकरण करणारे जिवाणूंच्या संख्येत मोठया प्रमाणावर घट झालेली आहे. यामुळे नत्रयुक्त खताची कार्यक्षमता ४० ते ५० टक्के, स्फुरद खताची कार्यक्षमता १५ ते २५ टक्के तर पालशयुक्त खताची कार्यक्षमता ५० ते ६० टक्के व सुक्ष्म मुलद्रव्याची कार्यक्षकता ६ टक्क्य़ांपर्यंत खाली आली आहे.      यावरून हे स्पष्ट होते की, जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत झालेल्या घटीमुळे मुख्य, दुय्यम व सुक्ष्मद्रव्याच्या उपलब्धतेत मोठया प्रमाणावर घट झाली. यामुळे रासायनिक खत टाकण्याचे समाधान शेतकऱ्याला होत असले तरी नगदी परताव्यातील घट ही सुक्ष्म जिवाणूंच्या संख्येशी व कार्यक्षमतेशी निगडीत असल्याचे शेतकऱ्यांचे प्रबोधन कृषि शास्त्रज्ञांकडून झाले नाही.

पंजाब, हरियाणा या राज्यात हरितक्रांतीच्या माध्यमातून खते, औषधी, संकरीत वाणाचा वापर धान्य उत्पादन वाढीसाठी मोठय़ा प्रमाणावर झाला त्याच राज्यात सेंद्रीय कर्बाची पातळी महाराष्ट्र राज्यापेक्षाही चिंताजनक होती मात्र त्या ठिकाणी खरीपात भाताचे पीक घेतल्यानंतर रब्बीत गव्हाचे पीक शेतीची कोणतीही मशागत न करता भाताच्या अवशेषात पेरणी करणारी यंत्रे आयात करण्यात आली आणि पशुधनाद्वारे शेणखत उपलब्ध करून जमिन सुपीकता करण्याच्या तंत्रास बगल देऊन जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाणात सातत्य राखण्यासाठी सदरील यंत्राचा वापर करण्यात आला. महाराष्ट्रातील चारही कृषी विदयापीठे अनेक कृषी विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्थांनी मात्र अशा प्रकारच्या पीक पद्धतीवर त्यांच्या प्रक्षेत्रावर जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्याचे पीक प्रात्यक्षीक, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा घेण्यात लक्ष केंद्रीत केलेले नाही. तसेच कृषि विदयापीठाच्या अभियांत्रीकी विभागाने जून्या पिकाच्या अवशेषात पेरणी करणारी यंत्रे विकसीत करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात संशोधन करण्यावर भर दिला नाही. वास्तविक आपले शेतीचे क्षेत्र उष्णकटीबंधीय, समशितोष्णकटीबंधीय प्रदेशात मोडत असल्यामुळे उष्णतेमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचा ऱ्हास नसíगकरित्या जास्त होतो. तेव्हा शेतीची मशागत गरजेऐवढीच केली तर सेंद्रीय कर्बाचा ऱ्हासही कमी होईल आणि उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन नगदी नफ्यातील वाढीस वाव मिळेल.

भविष्यात जमिनीची सुपिकता पूर्वपदावर आणण्यासाठी पशुधनाचा वापर करून सेंद्रीय खत निर्माण करणे व त्याचा वापर शेतीत करणे हे मजूरा अभावी कालबाह्य़ बाब होत आहे. तेव्हा उपरोक्त प्रमाणे सेंद्रीय कर्बाचा विनाखर्चीक पुरवठा जमिनीस करून जमिनीची सुपिकता पातळी कायम ठेवणे या करिता विशेष लक्ष संशोधकाला केंद्रीत करावे लागणार आहे. तरच पुढच्या पिढीस पूर्वजांनी दिलेली जमिनीची सुपिकता जसेच्यातसे हस्तांतरीत करणे सध्याच्या शेतकऱ्यांना शक्य होईल आणि दुसरी हरितक्रांती करण्यासाठी योग्य अशी अनुकूलता निर्माण होईल.

– डॉ. जी. टी. थोंटे

(लेखक लातूर कृषि विभागात तंत्र अधिकारी आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:00 am

Web Title: green revolution and smart farming techniques
Next Stories
1 कृषिपूरक व्यवसायातून प्रगतीकडे
2 भाव पडले, विपरीत घडले..
3 पेरणी : ऊस
Just Now!
X