तूर, मूग, उडीद

  • अंतर – मूग-उडीद ३० बाय १०० सें.मी. लवकर येणारी तूर ४५ बाय १० सें.मी.; मध्यम कालावधीची तूर ६० बाय २० सें.मी.
  • बीजप्रक्रिया – उत्पादनवाढीसाठी गुळाच्या थंड द्रावणात मिसळलेले २५० ग्रॅम ‘जिवाणू संवर्धक’ १० ते १५ किलो बियाण्यास चोळून ते सावलीत वाळवतात. यामुळे पिकाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते. त्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण चांगले होऊन उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते.
  • बियाणांचे प्रमाण – मूग व उडीद यांचे हेक्टरी बी १२ ते १५ किलो वापरतात. लवकर येणाऱ्या तुरीचे बियाणे हेक्टरी २० ते २५ किलो; तर मध्यम किंवा उशीरा येणाऱ्या तुरीचे बियाणे हेक्टरी १२ ते १५ किलो वापरणे योग्य ठरते.
  • सुधारित जात – तुरीच्या लवकर येणाऱ्या जातीत आयसीपीएल ८७ व टीएटी १० या १२०-१२५ दिवसांत तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरण्या प्रकारात बीडीएन १ व २ तसेच, टी-विशाखा १ या जाती असून त्या १५५ ते १६५ दिवसांत तयार होतात. सी-११, नं – १४८ व आयासीपी ८७११९ या जाती तुरीच्या गरण्या प्रकारात मोडतात. यांचा तयार होण्याचा कालावधी १७० ते १९० दिवसांचा असतो. मूग पिकाच्या बीएम ४, जळगाव ७८१, फुले एम२ या प्रमुख जाती असून या पिकाचा कालावधी ६० ते ६५ दिवसांचा असतो. उडीद पीकही ६५ ते ७५ दिवसांत तयार होते. टी-९, टीएयू १ व २, टीपीयू-४, शिंदखेडा १-१ हे उडीद पिकाचे सुधारित वाण आहे.