एके काळी तुरीचे सरासरी उत्पादन एकरी क्विंटल होते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे उत्पादन २० ते २५ क्विंटलपर्यंत नेणारे शेतकरी आहेत. शेतीत ऊस, द्राक्ष अशा पिकांतून मोठे उत्पादन मिळते, मात्र अवर्षणामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे. पर्यायी पीक म्हणून बागायती शेतकरीही आता तुरीच्या उत्पादनाकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहेत.

तुरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्वी चारशे वर्षांपूर्वी बौद्ध साहित्यात व तसेच चरकसंहितेतही तुरीचा उल्लेख आढळतो. कमी खर्चात सर्वाधिक प्रोटीन देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे जेवणात तूरडाळीचा समावेश सर्वाधिक असतो.

गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वत्र तूरडाळीचा वापर होतो. तूर हे प्रामुख्याने आफ्रिकेतील पीक आहे असे सांगितले जाते, मात्र नव्या संशोधनानुसार ते भारतीय पीक असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घेतले जाते. सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडय़ात तुरीचा पेरा केला जातो. मध्यम ते भारी प्रकारची जमीन व त्यातही पाण्याचा निचरा होणारी याला प्राधान्य दिले जाते. जमिनीचा सामू (पीएच) ५ ते ७ असावा लागतो. तुरीच्या मुळा खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरणी व त्यावर दोन वेळा पाळी घालून जमीन भुसभुशीत केली जाते. काही शेतकरी तुरीत आंतरपीक घेतात, तर काही जण केवळ तूरच पेरतात. काही जण दोन ओळींतील अंतर आठ फूट तर काही जण दहा फूट ठेवतात. दोन रोपांतील अंतर दीड फुटापासून चार फुटांपर्यंत ठेवले जाते. कोरडवाहू शेतीतही तूर पेरली जाते. आता नव्याने बागायती शेती करणारे ठिबक सिंचनाचा वापर तुरीच्या लागवडीसाठी करतात.

प्रारंभीचे ३० ते ४० दिवस या पिकाची वाढ अतिशय सावकाश होते. २० ते २५ दिवसाला पहिली कोळपणी व त्यानंतर ३० ते ३५ दिवसाला दुसरी कोळपणी केली जाते. आयसीपीएल ८७, एकेटी ८८११, विपुला, टी विशाखा १, बीडीएन २, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ या तुरीच्या सुधारित जातीचा वापर शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करीत आहेत.

एके काळी तुरीचे सरासरी उत्पादन एकरी ४ क्विंटल होते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे उत्पादन २० ते २५ क्विंटलपर्यंत नेणारे शेतकरी आहेत. शेतीत ऊस, द्राक्ष अशा पिकांतून मोठे उत्पादन मिळते, मात्र अवर्षणामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे. पर्यायी पीक म्हणून बागायती शेतकरीही आता तुरीच्या उत्पादनाकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहेत. गेल्या काही वर्षांत तुरीला मिळणाऱ्या भावामुळे शेतकरी तुरीच्या उत्पादनाकडे वळतो आहे. लातूर जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ होता, त्यामुळे फळबागा व उसाच्या शेतीपासून शेतकरी परावर्तित झाला.

औसा तालुक्यातील बोरगाव येथील विनय देशपांडे या शेतकऱ्याची मोठी जमीन आहे. गेल्या २५ वर्षांपासून द्राक्षाचे उत्पन्न घेणारे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अवर्षणामुळे या वर्षी त्यांनी द्राक्षबाग मोडली. १८ मे रोजी पाच एकर जमिनीत बीएसएमआर ७३६ हे तुरीचे वाण टोकण पद्धतीने लावले व ठिबकने पाणी दिले. दोन ओळींतील अंतर साडेआठ फूट व दोन रोपांतील अंतर दोन फूट ठेवले. कर्नाटक ६३ या वाणाची रोपे करून सात एकर जमिनीत २० मे रोजी लावण केली. उन्हाळा कडक असल्यामुळे दररोज एक तास ठिबकने पाणी दिले. त्यानंतर या वर्षी मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे पीक जोमात आले. मात्र फलधारण उशिरा झाली.

तुरीचे उत्पादन नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित होते ते आता डिसेंबरअखेर येईल. तुरीला लागणारी सर्व खते ठिबकमधून देण्यात आली. आतापर्यंत चार फवारण्या करण्यात आल्या आहेत. तुरीची उंची दहा ते बारा फूट असून साधारणपणे एका झाडापासून दोन किलो उत्पादन होईल असा देशपांडे यांचा अंदाज आहे. एका एकरामध्ये २ हजार तुरीची झाडे असतात. त्यांच्या अंदाजाप्रमाणे उत्पादन मिळाल्यास एकरी ४० क्विंटल उत्पादन होईल. अंदाज थोडा चुकला तरी २५ क्विंटल एकरी किमान उत्पादन त्यांनी गृहीत धरले आहे. डिसेंबरअखेर तुरीची रास झाल्यानंतर

खोडव्याचे उत्पादन घेण्याचा त्यांचा विचार असून यापूर्वी असे उत्पादन घेतल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यासाठी लागणारे पाणीही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

१९९५ साली जलसंधारणाचे मोठे काम करणारा पहिला शेतकरी म्हणून विनय देशपांडे यांची ओळख आहे. सध्या शेतालगतच्या असणाऱ्या नाल्यामध्ये सुमारे ७ विहिरीत व दोन शेततळय़ांत मिळून २५ ते २८ कोटी लिटर पाणी त्यांच्याकडे आहे. या पाण्याचा उपयोग ठिबक व तुषार सिंचनाद्वारे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो. कुठेही पाटाने पाणी दिले जात नसल्याचे ते म्हणाले.

आंतरपिके

तूर पीक घेताना त्यासोबत शेतात इतर कोणती आंतरपिके घेता येणे शक्य आहे, याचा विचार शेतकऱ्यांकडून नेहमीच केला जातो. मात्र, आंतरपिकांचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. तूर-बाजरी (१ : २), तूर-सुर्यफूल (१ : २), तूर-सोयाबिन ( १ : ३) किंवा ( १ : ४), तूर-ज्वारी ( १ : २) किंवा ( १ : ४), तूर-कापूस ( १ : ६), तूर-भुईमुग, तूर-मूग ( १ : ३), तूर-उडीद  (१ : २)  अशी आंतरपिके घेता येणे शक्य आहे. तूर पीक घेतल्यावर आयपीसीएल-८७ वाणाकरिता हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या एकेटी ८८११, विपुला, राजेश्वरी करिता हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.

पीक संरक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये घाटे आळी, पिसारी पतंग, शेंग माशी या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करावे. तृणधान्याचे आंतरपीक असल्यास किडींचे प्रमाण कमी राहते. एचएएनपीव्ही या जैविक कीड नियंत्रणाचा वापर करावा. फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १२-१५ दिवसांनी हेलिओकील ५०० मिली/हे. आणि गरजेनुसार तिसरी फवारणी, कोराजन २० टक्के प्रवाही १०० मिली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारावे. हे खरीप हंगामातील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. पावसामुळे खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये (३०-३५ दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (३०-७० दिवस) आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी देणे आवश्यक आहे. तुरीच्या शेंगा वाळल्यावर पिक कापून घ्यावे.

pradeepnanandkar@gmail.com