पर्यटनाच्या वेगवेगळ्या संकल्पना आधुनिक काळानुसार आकारास येत आहेत. काही जणांना दूरच्या देशात, काहींना समुद्रकिनारी, तर काहींना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत धार्मिक पर्यटनाची हौस असते. पर्यटन करणाऱ्या मंडळींच्या आकडेवारीचा ठोकताळा मांडल्यास ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिक पर्यटनासाठी अधिक प्रमाणात बाहेर पडतात. शहरी भागातील मानसिक आणि शारीरिक थकवा आणणाऱ्या जीवनपद्धतीतून वेळ काढत महिन्यातून दोन-तीन दिवस तरी आपल्या आवडीनुसार घालविण्याची इच्छाच त्यांना शहराबाहेर पडण्यास भाग पाडत आहे. कित्येक देशांमध्ये पर्यटनाच्या पारंपरिक संकल्पना मोडीत निघून नवीन काही तरी वेगळे धुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. पर्यटन म्हणजे पैसा असणाऱ्यांची हौस, हा समज आता मोडीत निघाला आहे. शांत, निवांत आणि ग्रामीण जीवन जवळून न्याहाळण्याची आवड असलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार आता चांगलाच रुजला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी घाम गाळतो. रात्रंदिवस काम करून जेव्हा हाती येणाऱ्या पिकाला योग्य भाव मिळत नाही तेव्हा त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. कधी लहरी निसर्गाचा फटका बसून येणाऱ्या पिकावर बघता बघता त्याला पाणी सोडावे लागते. त्यामुळेच शेतकऱ्यांना आता कृषिपूरक व्यवसाय गरजेचा झाला आहे. शेती व्यवसायाला कृषी पर्यटनासारख्या जोडव्यवसायाची साथ मिळून शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडू शकते. महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) यांसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत स्थापन झालेल्या संस्थांकडून कृषी पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतावर जाऊन राहणे, फिरणे, ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणे, आणि ग्रामीण आदरातिथ्य स्वीकारत मिळालेल्या नवीन ऊर्जेमुळे पुन्हा शहरी रहाटगाडय़ाच्या जीवनास तोंड देण्यास सिद्ध होते.

महाराष्ट्रात कृषी पर्यटनाचा प्रयोग यशस्वीपणे राबविणाऱ्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील सर्व विभागांत हा व्यवसाय नेण्याचा विचार मांडला. त्यासाठी १२ डिसेंबर २००८ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानात महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) या संस्थेची स्थापना करण्यात आली. राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या ३२८ पर्यंत गेली असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम एजंट्स ऑर्गनायझेशन ऑफ नाशिक’ (तान) ही संस्था तसेच कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून लक्ष देण्यात आलेले नाही. सहा लाखांपासून तर १० लाखांपर्यंतच्या खर्चात आपआपल्या कुवतीनुसार शेतात निवासासाठी किमान सहा खोल्या, एखादी सभामंडपासारखी मोठी खोली याच्यासाठीच प्रामुख्याने खर्च येतो. बैलगाडीतून फेरफटका, म्हैस किंवा गाईचे दूध पारंपरिक पद्धतीने कसे काढले जाते, खापरावर मांडे कसे केले जाते या अशा गोष्टींचे शहरी वातावरणात रुळलेल्यांसाठी ते मोठे अप्रूप असते. त्यांना असेच काही देण्याचा प्रयत्न कृषी पर्यटनातून होणे आवश्यक आहे.  पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीसह शेतीची माहिती, कोणते पीक कसे येते, कोणत्या फळापासून शरीराला कोणता फायदा होतो याची माहिती देण्यासह परिसरातील डोंगरदऱ्या, मंदिरांची ओळख करून देणे असे प्रयत्न झाल्यास हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. नाशिक येथे आयोजित एका कृषी पर्यटनविषयक कार्यक्रमात जिल्ह्य़ात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची तयारी आठ जणांनी दर्शविली असून त्यांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले. कृषी पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अशा केंद्रांना संलग्न करून त्यांची माहिती पुस्तिका किंवा संकेतस्थळावर त्या कृषी पर्यटन केंद्रांची नावे टाकून प्रसिद्धीस साहाय्य केले जाते. जिल्हा बँक ‘फार्म हाऊस’साठी अर्थसाह्य़ करते, परंतु कृषी पर्यटन केंद्रासाठी अशा प्रकारच्या कर्जाची व्यवस्था नाही. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून त्यासाठी मदत होणे आवश्यक असल्याचे मत भालेराव यांनी व्यक्त केले. राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादितचे पदाधिकारी पांडुरंग तावरे यांना कृषी पर्यटनाचे जनक मानले जाते.

अलीकडेच त्यांनी कृषी पर्यटनाच्या प्रसारासाठी पळशीवाडी येथील बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात ‘फार्म मॅरेथॉन’चे आयोजन केले होते. मोरगाव येथे त्यांची ३० एकर शेती. याच ठिकाणी त्यांनी कृषी पर्यटन केंद्राचा प्रयोग यशस्वीपणे राबविला. तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू व्हावीत, शेतकऱ्यांना या पूरक व्यवसायाची माहिती व्हावी हे लक्षात ठेवत त्यांच्या प्रचार व प्रसारास वाहून घेतले. त्यांनी कृषी पर्यटन व्यवसाय कसा विकसित होऊ शकतो यावर अभ्यास केला. गावातील सण, उत्सव, परंपरा यांची माहिती पर्यटकांना देऊन ग्रामीण संस्कृती, पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम होऊ शकते, असे तावरे यांनी नमूद केले आहे.

कृषी पर्यटन केंद्राचे फायदे

* शेतातील जागेतच केंद्र असल्यामुळे नवीन जागा शोधण्याची कटकट नाही.

* कृषिपूरक व्यवसायामुळे पिकांचे नुकसान, भाव न मिळणे यातील नुकसान केंद्रामुळे भरून निघण्यास मदत.

* केंद्रामार्फत कृषिमाल थेट ग्राहकांच्या हाती.

* सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला

भाजीपाला, फळे, अन्नधान्य ग्राहकांना मिळण्याचे ठिकाण.

* गावातील महिला बचत गटांमार्फत तयार मालाच्या विक्रीसाठी आयतेच केंद्र.

* शेतकऱ्यांसह गावातील युवकांना गावपातळीवर रोजगार.

* शहरी पर्यटकांमुळे आधुनिकतेशी ओळख होण्यास मदत.

* गावाला प्रसिद्धी मिळणे शक्य.

* संस्कृती, पर्यावरण संवर्धनास मदत.

अविनाश पाटील avinashpatil@expressindia.com

Web Title: Agritourism
First published on: 27-10-2016 at 05:29 IST