देशांतर्गत डाळी आणि कडधान्यांचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डाळी आणि कडधान्य लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यत रब्बी हंगामात १४ हजार ५७४ हेक्टरवर डाळी आणि कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख २४ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड केली जाते. सिंचनाची सोय नसल्याने रब्बी हंगामात शेतकरी फारशी पीक घेत नाही. पांरपरिक वाल पावटा आणि काही ठिकाणी भुईमुगाची लागवड सोडली तर शेतकरी दुबार पीक घेत नाही. या वर्षी खरीप हंगामात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सरासरीच्या तुलनेत सर्वत्र १२० टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

भातकापणीनंतर जमिनीत ओलावा टिकून असल्याने या वर्षी रब्बी हंगामात कडधान्य आणि डाळीच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. देशांतर्गत डाळी आणि कडधान्यांचा तुटवडा लक्षात घेऊन कृषी विभागाने या पिकांच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

जिल्ह्यात ६ हजार २३१ हेक्टरवर वाल, १ हजार ५११ हेक्टरवर चवळी, ७७७ हेक्टरवर हरभरा, १ हजार ६८९ हेक्टरवर मूग, १८ हेक्टरवर उडीद, ९१९ हेक्टरवर तूर, १ हजार २४७ हेक्टरवर मटकी, २ हजार ०८९ हेक्टरवर इतर कडधान्य, १८६ हेक्टरवर भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे.

भात पिकानंतर रायगड जिल्ह्यत साधारणपणे वाल भुईमूग आणि तूर यासारखी पिके घेतली जात असत. या वर्षी मात्र मूग, मटकी, हरभरा आणि चवळी या पिकांची त्यात भर पडली आहे. कडधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभागाने या वर्षी विशेष लक्ष दिले होते. शेतकऱ्यांना अनुदानित बियाणेही पुरवण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या वर्षी रब्बी हंगामातील उत्पादनात चांगली वाढ अपेक्षित असल्याचे कृषी अधीक्षक के.बी तरकसे यांनी सांगितले.

  • सलग दोन वर्ष पर्जन्यमान कमी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीक लागवडीकडे दुर्लक्ष केले होते.
  • जमिनीत पुरेशी ओलावा शिल्लक नसल्याने हा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे आधीच कमी असलेले रब्बी क्षेत्र कमालीचे घटले होते. या वर्षी मात्र दमदार पावसाने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
  • कडधान्य आणि डाळींच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. माणगाव अलिबाग महाड आणि खोपोली या चारही उपविभागात रब्बी लागवड मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षी खरीप पोठापाठ रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना दमदार उत्पादन येईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

meharshad07@gmail.com