मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागला आहे. चिखलदऱ्यात अलीकडेच स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता वनौषधींच्या उत्पादनाचे प्रयोगही होत आहेत. काटकुंभ येथील प्रयोगशील शेतकरी गणेश राठौर हे मागील अनेक वर्षांपासून डोंगराळ भागात पांढऱ्या मुसळीची शेती करत आहेत. हा प्रयोग वनौषधी उत्पादनातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आशेचा किरण ठरला आहे. राज्य फलोद्यान व वनौषधी महामंडळाचे या उपक्रमाला सहकार्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काटकुंभ हे गाव चिखलदरा तालुक्यात आहे. तेथील रहिवाशी गणेश राठौर यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय. आताआतापर्यंत राठोड हे कापूस, गहू, ज्वारी, तूर अशा पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत होते. तथापि, सततचे बदलते हवामान, बाजार भावातील अनिश्चितता व वाहतुकीसह विविध खर्च यामुळे राठौर यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली. वनौषधी हा त्याला उत्तम पर्याय ठरू शकतो, असे त्यांना कळले. विशेष म्हणजे सफेद मुसळीची माहिती मिळताच त्यांनी या उत्पादनाच्या सर्व तांत्रिक बाबींचा विचार केला व मुसळी लागवडीचा निर्णय घेतला व शासनाकडे अर्ज केला. पुणे येथील वनौषधी मंडळाकडून त्यांना १ लक्ष २६ हजार रुपये अनुदान मिळाले. मुसळी साफ करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी ‘आत्मा’ कडून ५० हजार रुपये मिळाले. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव ‘क्लोरोफायटम बोरिवीलियनम’ असे असून यामध्ये औषधी व शक्तीवर्धक गुणधर्म आढळतात. विविध आजारांवर गुणकारी मुसळी मेळघाटातील रोजगारासाठी विशेष लाभदायी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने पांढऱ्या मुसळी पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. ही शेती करण्यासाठी विविध स्तरावरून माहिती घेत आहे. ही शेती कष्टाची असली तरी हमखास उत्पादन देणारी आहे. या शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रोजगारासाठी भटकंती करण्याची गरज स्थानिकांना राहिली नाही, असे गणेश राठौर सांगतात.

महत्वाची वनौषधी

मुसळी ही आयुर्वेदात आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण वनऔषधी मानली जाते. त्याला परदेशात चांगली मागणी आहे. मेळघाटसारख्या अरण्यसंपन्न प्रदेशात मुसळी आढळते; तथापि, मुसळीच्या अधिक उत्पादनासाठी शेती हाच पर्याय आहे. वनौषधी महामंडळाच्या सहकार्याने दरवर्षी मोठय़ा प्रमाणात मुसळीचे उत्पादन घेतल्या जात आहे. राठौर यांच्याप्रमाणेच काटकुंभ परिसरातील ८ ते १० शेतकऱ्यांनी १६ हेक्टरमध्ये पांढऱ्या मुसळीची लागवड केली आहे. गणेश राठोड यांना लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळू लागले आहे. मुसळीला विदेशी बाजारपेठेतही विशेष मागणी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथे ही मुसळी विक्रीकरिता पाठवली जाते. मुसळीच्या शेतीतून गावात २०० शेतकऱ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. काही आदिवासी शेतकरी आंतरपीक म्हणूनही मुसळीची लागवड करीत आहेत.

(लेखक शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे शिक्षण घेत आहेत.)

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melghat tribal people musli farming
First published on: 25-11-2017 at 01:40 IST