हळद लागवडीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीतले उत्पादन वाढवण्यासाठी रायगड जिल्ह्यात सध्या वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. हळद लागवडीचा प्रयोगदेखील यापकी एक. पश्चिम महाराष्ट्रातील कोरडय़ा हवामानात होणारे हळदीचे पीक कोकणातील दमट हवामानातही चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते. हे माणगाव आणि म्हसळा परिसरातील शेतकयांनी सिद्ध करून दाखवले आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेनी हळद लागवडीसाठी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडातील शेतीत पिवळी क्रांती होताना पाहायला मिळणार आहे.

अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, पनवेल, खालापूर, पेण, रोहा या तालुक्यांमध्ये जवळपास १२० एकरवर हळदीची लागवड केली जाते. हे क्षेत्र वाढविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. आगामी वर्षांत जिल्ह्यातील ४५० ते ५०० एकर क्षेत्रात हळद लागवड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हळद हे नगदी पीक आहे. नऊ महिन्यांत याचे पीक येते. दोन महिने पाणी द्यावे लागते. परंतु रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळे हळदीचे पीक शेतकरी घेत नव्हते.

त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे हळदीचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सांगलीहून हळदीचे बियाणे आणून शेतकऱ्यांना दिले होते. आता हळदीची लागवड कशी करावी याचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.

हळदीचे उत्पादन केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणारे यंत्र शेतकरी गटांसाठी देण्यात येणार आहे. या यंत्रात कुकर व बॉयलर असेल. त्याचबरोबर पॉलिश व पावडर करण्याची सुविधा याच यंत्रात असणार आहे. या यंत्राची किंमत ९ लाख ९० हजार येवढी आहे. मात्र जिल्हा परिषदेकडून तब्बल ९० टक्के अनुदानातून हे यंत्र देण्यात येणार आहे. पहिले यंत्र कर्जत तालुक्यातील शिवाजी पाटील व त्यांच्या सोबतच्या शेतकरी गटाला देण्यात येणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना हळदीचे बियाणे ७५ टक्के अनुदानातून देण्यात येणार आहे. या बियाणांसाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातील तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे यांनी केले आहे.

कोकणातील शेती हा आतबट्टय़ाचा व्यवहार असल्याची ओरड नेहमी केली जाते. येथील भौगौलिक परिस्थिती आणि शेतीचे क्षेत्रफळ याला कारणीभूत ठरते. अशा वेळी कमी जागेत जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक घेणं गरजेचं आहे. मात्र उत्पादित मालाला बाजारपेठ मिळेल आणि नवीन पीक कोकणात होईल का या भीतीने अनेकदा शेतकरी पारंपरिक पिकांमध्ये अडकून राहतात. पण शाश्वत शेती शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन नवीन पिकं घेतली पाहिजेत असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

meharshad07@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district council initiative for cultivation of turmeric
First published on: 03-03-2016 at 03:34 IST