18 March 2019

News Flash

संपादकीय : प्रकाशाची आस…

इतके दिवस मराठी हीच महाराष्ट्रातल्यांची ओळख होती.

सगळ्या महाराष्ट्रभर यंदा पाऊस बरसलाय. मराठवाडय़ाला एरवी त्याचे देणे तसे हातचे राखून असते. यंदा मात्र अपवाद. तिथल्या नद्यांना बरीच वष्रे काठोकाठ भरणेदेखील माहीत नाही. यंदा मात्र त्यांनी काठ ओलांडून पाहिला. मराठवाडय़ातल्या नद्यांना पूर आला.

तेव्हा महाराष्ट्रात यंदा पीकपाणी चांगले होईल अशी आशा करायला हरकत नाही. बऱ्याच वर्षांनी सगळा महाराष्ट्र दिवाळी साजरी करेल. तरीही या चांगल्या पाऊसपाण्याच्या आनंदाला एक कातरता आहे.

राज्यात अन्यत्र जे काही घडते आहे त्यामुळेआलेली.

इतके दिवस मराठी हीच महाराष्ट्रातल्यांची ओळख होती. आता मराठी माणसाला तेवढी ओळख अपुरी वाटू लागली आहे.

आता त्याला जात लागते. ती नुसती सांगून चालत नाही. उपजातही लागते. तीही नुसती सांगून चालत नाही. कोण्या गावचे, कोण्या  कुळातले, कोणाच्या नात्यातले वगरे तपशीलही लागतो.

म्हणजे एका माणूसपणाची ओळख पटवण्यासाठी इतके सारे हे आवश्यक घटक. आणि पुन्हा त्यात तुझी ओळख मोठी की माझी, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याच ‘ओळखीतल्यां’ची जमवाजमव.

बातमी व्यवसायातल्यांनी त्याला छान शब्द काढलाय..

शक्तिप्रदर्शन!

परंतु मुदलात शक्ती प्रदíशत करावी लागते का? तशी ती लागत असेल, तर तिला शक्ती म्हणावे का? आणि जे प्रदíशत करीत नाहीत, त्यांच्यात शक्ती नसते का? खरे शक्तिशाली असतात ते ‘ही बघा माझ्यातली शक्ती!’ असे सांगत उगा हिंडत बसतात का? ओळख आणि अस्मिता मिरवण्याच्या भाऊगर्दीत संबंधितांनी कधीतरी या आणि अशा प्रश्नांना भिडायची  शक्तीही आपल्यात आहे, हेही दाखवायला हवे.

दिवाळीच्या निमित्ताने याची जाणीव होईल,अशी आशा. आणि समजा, ती जाणीव नाही झाली, तर या सणाच्या निमित्ताने पहाटेच्या सुखद गारव्यात तेवणाऱ्या दिव्यांकडे पाहायचे.

लक्षात येईल, की मिरवण्याची, शक्तिप्रदर्शनाची गरज अंधाराला असते; प्रकाशाला नाही.

अशा प्रकाशाची आस तुम्हा-आम्हाला लागो, या शुभेच्छांसह..

आपला,

03-ls-diwali-2016-girish-sign

First Published on March 8, 2017 1:27 am

Web Title: diwali issue 2016 editorial ablout casteism