News Flash

वेब २.० : महाजालाचे सहभागात्मक रूप

येणारा काळ हा वेब २.० कंपन्यांचाच असेल असं म्हणणारा टीम ओरायली किती द्रष्टा आहे याची खात्री पटते..

|| अमृतांशू नेरुरकर

आज आपल्या आजूबाजूला दिसत असलेला समाजमाध्यमांचा भस्मासुर आणि त्या अनुषंगाने सेवा पुरवणाऱ्या महाजालातल्या कंपन्या पाहिल्या की येणारा काळ हा वेब २.० कंपन्यांचाच असेल असं म्हणणारा टीम ओरायली किती द्रष्टा आहे याची खात्री पटते..

ओपन सोर्सचा खंदा पुरस्कर्ता आणि ओरायली मीडिया या संगणक तंत्रज्ञानावरील पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या संस्थेचा सर्वेसर्वा टीम ओरायलीने ऑक्टोबर २००४ मध्ये अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात महाजाल किंवा वर्ल्ड वाइड वेबच्या बदलत्या संरचनेवर चर्चा घडवून आणण्यासाठी एका परिषदेचे आयोजन केले होते. एकविसाव्या शतकाची सुरुवातीची काही वर्षे वेब तंत्रज्ञान एका संक्रमणातून जात होते. एका बाजूला डॉट कॉमचा फुगा फुटला होता. वेब तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची माहिती व सेवा पुरवणारे पोर्टल्स व संकेतस्थळं एकामागोमाग एक बंद पडत होते. तर दुसऱ्या बाजूला अशा निराशाजनक परिस्थितीतही गुगल, अमेझॉन, विकिपीडिया, ईबे यांसारख्या काही वेब तंत्रज्ञानावरच आधारलेल्या डिजिटल कंपन्यांची मात्र झपाटय़ाने वाढ होत होती.

वेब तंत्रज्ञान अशा विरोधाभासात्मक परिस्थितीतून जात असताना २००४ सालातल्या या परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. जगभरातल्या संगणक तंत्रज्ञांची या परिषदेसंदर्भात उत्सुकता वाढण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे टीम ओरायलीने या परिषदेचं केलेलं ‘वेब २.०’ असं अभिनव नामकरण! पुढे तांत्रिक तसेच व्यावसायिक वर्तुळात देखील प्रचंड लोकप्रिय झालेल्या या संज्ञेचा उगम या परिषदेपासून झाला. स्थित्यंतरातून जाणाऱ्या वेब तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा एक सम्यक दृष्टिकोन वेब २.० परिषदेने या संज्ञेतून दिला असं म्हणणं अनुचित ठरणार नाही. ओपन सोर्स व्यवस्थेची पाश्र्वभूमी असल्यामुळे आणि एकंदरीतच महाजालाच्या संरचनेवर या संकल्पनेचे दीर्घकालीन व दूरगामी परिणाम झाल्यामुळे वेब २.० संकल्पनेला अभ्यासणे इथे उचित ठरेल.

खरं सांगायचं तर वेब २.० या संज्ञेचा सर्वात पहिला वापर टीम ओरायलीच्या पुष्कळ आधी, डार्सी डीनुची या माहिती तंत्रज्ञान विषयाची विश्लेषक असलेल्या महिलेने १९९९ मध्येच केला होता. त्या वर्षी पाम इंक. या कंपनीने पहिला पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टन्ट) बाजारात आणला होता. त्यामुळे यापुढे इंटरनेट व वर्ल्ड वाइड वेब हे फक्त डेस्कटॉप किंवा लॅपटॉपपुरते सीमित राहणार नाही तर भविष्यात इतर अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरसुद्धा ते वापरले जाऊ  शकेल असा मुद्दा डीनुचीने आपल्या ‘फॅ्रगमेन्टेड फ्युचर’ या लेखात मांडला होता. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर इंटरनेट उपलब्ध होण्याच्या संकल्पनेला तिने वर्ल्ड वाइड वेबची पुढील आवृत्ती अर्थात ‘वेब २.०’ असं संबोधलं होतं.

टीम ओरायलीला मात्र या संज्ञेचा वरील अर्थ अपेक्षित नव्हता. त्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाने या संज्ञेला एक व्यापक परिमाण दिले, जे आजतागायत टिकून राहिलं आहे. नव्वदच्या दशकापासूनच टीम ओरायली ओपन सोर्स व्यवस्थेचे बारकाईने विश्लेषण करत होता. लिनक्ससारख्या यशस्वी व प्रदीर्घ काळ चाललेल्या प्रकल्पातून त्याने ओपन सोर्स प्रकल्पांचे व्यवस्थापन, जगभरात विखुरलेल्या तांत्रिक समुदायांचा ऐच्छिक पण सक्रिय सहभाग व त्यातून प्रकल्पाला मिळणारे योगदान, मतभेदांचं स्वागत करणारी व प्रकल्पासंदर्भातल्या कुठल्याही प्रकारच्या चर्चा किंवा वादविवाद खुल्या पद्धतीने घडवणारी मतभेद हाताळण्याची पद्धत, सॉफ्टवेअरची दर आठवडय़ाला (लिनक्सच्या बाबतीत तर दर दिवसाआड) प्रसिद्ध होणारी नवी आवृत्ती अशा अनेक बाबींचा त्याने अभ्यास केला होता. डॉट कॉमचा फुगा फुटला असतानाही यशस्वी घोडदौड करणाऱ्या गुगल, अमेझॉन, विकिपीडियासारख्या वेब पोर्टल्समध्ये आणि ओपन सोर्स व्यवस्थेमध्ये त्याला काही साम्यस्थळं दिसली.

त्याला हे जाणवलं की या वेब पोर्टल्सच्या यशामागे त्यांच्या वापरकर्त्यांच्या सक्रिय सहभागाचा मोठा हात आहे. उदाहरणार्थ, विकिपीडिया या ऑनलाइन ज्ञानकोशाची निर्मिती विविध क्षेत्रांतले काही ठरावीक तज्ज्ञ करत नाहीत तर विकिपीडियाला भेट देणारा कोणताही वाचक ज्ञानकोशात नव्या माहितीची भर घालू शकतो किंवा तेथे अगोदरच उपलब्ध असलेल्या माहितीत बदल करू शकतो. ब्रिटानिका किंवा एनकार्टासारख्या पारंपरिक ज्ञानकोशांपेक्षा ही ज्ञानकोश निर्मितीची अत्यंत अभिनव पद्धत होती.

अ‍ॅमेझॉनसारखी ई-कॉमर्स कंपनी तिच्या प्रतिस्पध्र्याप्रमाणे (वॉलमार्टसारखा पारंपरिक प्रतिस्पर्धी असेल किंवा barnesandnoble.com सारखं पुस्तकं विकणारं संकेतस्थळ असेल) केवळ वस्तूंची विक्री करत नाही. त्यापुढे जाऊन ती आपल्या वापरकर्त्यांला त्याने विकत घेतलेल्या वस्तूंवर व एकंदर खरेदीच्या अनुभवांवर अभिप्राय द्यायचं तसेच त्याच्या समाधानानुसार त्या वस्तूला गुणांकन देण्याचं आवाहन करते. जेव्हा एखादा नवा ग्राहक अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी येतो तेव्हा त्याला रस असलेल्या वस्तूंवर विविध ग्राहकांनी दिलेल्या अशा अभिप्रायांची व त्यांनी अगोदर विकत घेतलेल्या वस्तूंची सांगड घालून (ज्याला अ‍ॅमेझॉन A9 अल्गोरिदम असं संबोधते) अ‍ॅमेझॉन त्याला काही वस्तूंची शिफारस करते, ज्याचा बऱ्याचदा त्या ग्राहकाला योग्य वस्तू निवडण्यात फायदाच होतो. त्यामुळे जेवढे जास्त वापरकर्ते किंवा ग्राहक या सेवांचा फायदा घेतील त्याचा प्रत्येक नव्या वापरकर्त्यांला फायदा होईल, कारण त्याला आधीच्या वापरकर्त्यांच्या सहभागामुळे मिळणारं अनुभवाचं संचित उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल.

आपल्या ग्राहकाला किंवा आपण पुरवत असलेल्या सेवेच्या वापरकर्त्यांला अशा प्रकाराने सक्रियपणे सहभागी करून घेण्याची पद्धत ओपन सोर्स व्यवस्थेत होत असलेल्या तंत्रज्ञांच्या सामुदायिक सहभागाशी बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती होती. वापरकर्त्यांनी अशा वैयक्तिक स्तरावर दिलेल्या सहभागातून निर्माण होणाऱ्या सामूहिक ज्ञानाला ओरायलीने ” Collective Intelligence” असं चपखल नाव दिलंय. कलेक्टिव्ह इंटेलिजन्सचा यथायोग्य वापर हा या कंपन्याच्या, आपल्या प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत, यशस्वी होण्यामागचं मुख्य कारण आहे हे ओरायलीला जाणवलं.

म्हणूनच वेब २.० परिषदेत आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचा शेवट करताना ओरायलीने असं म्हटलं की, डिजिटल युगातील जी कंपनी वर्ल्ड वाइड वेबचा वापर प्रॉडक्ट विकण्यासाठी नाही तर सेवा पुरवण्यासाठी ‘प्लॅटफॉर्म’ म्हणून करेल, ग्राहक अथवा वापरकर्त्यांचा सक्रिय सहभाग हा जिच्या बिझनेस मॉडेलचा एक महत्त्वपूर्ण भाग असेल व या सहभागामुळे मिळणाऱ्या कलेक्टिव्ह इंटेलिजन्सचा वापर करून जी आपली सेवा सतत सुधारेल तसेच वापरकर्त्यांकडून विविध पद्धतीने मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपल्या सेवांची व्याप्ती वाढवेल, अशा कंपनीला वेब २.० कंपनी असं सार्थपणे म्हणता येईल. थोडक्यात महाजालाच्या सहभागात्मक व वापरकर्त्यांच्या वैचारिक देवाणघेवाणीवर आधारलेल्या या ‘सोशल’ स्वरूपाला वेब २.० असं म्हटलं गेलंय.

आज आपल्या आजूबाजूला दिसत असलेला सोशल मीडियाचा भस्मासुर आणि त्या अनुषंगाने सेवा पुरवणाऱ्या महाजालातल्या कंपन्या पाहिल्या की येणारा काळ हा वेब २.० कंपन्यांचाच असेल असं म्हणणारा टीम ओरायली किती द्रष्टा आहे याची खात्री पटते. आज संपूर्णपणे सोशल मीडियाला वाहिलेल्या फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या कंपन्या असोत किंवा वेब तंत्रज्ञानाच्या आधारे विविध सेवा पुरवणाऱ्या अमेझॉन, उबर, गुगल, एअरबीअ‍ॅण्डबी, स्कायस्कॅनरसारख्या कंपन्या असोत, वापरकर्त्यांचा सक्रिय सहभाग हा त्यातल्या प्रत्येकाच्या बिझनेस मॉडेलचा आत्मा आहे. यात विशेष म्हणजे यातल्या जवळपास प्रत्येक वेब २.० कंपनीच्या प्रणाली या संपूर्णपणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर आधारलेल्या आहेत. असो.

गेल्या अनेक लेखांमध्ये ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल आणि तिच्या व्यापक पटावरील काही महत्त्वपूर्ण घटकांचं व घटनांचं सखोल विश्लेषण केल्यानंतर आता आपण ओपन सोर्स संदर्भात उपस्थित होणाऱ्या काही मूलभूत प्रश्नांकडे आपला मोर्चा वळवणार आहोत. कसल्याही प्रकारच्या आर्थिक परताव्याची हमी नसूनदेखील जगभरात विखुरलेले तंत्रज्ञ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या फावल्या वेळात एकत्र येऊन ऑपरेटिंग प्रणाली किंवा त्याच्यासारख्या एखाद्या व्यापक आणि गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरची निर्मिती का करतात, हा खरोखरच दखल घ्यावी असा प्रश्न आहे. ओपन सोर्स प्रकल्पात योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांचा वेध आपण पुढील लेखात घेऊ.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:25 am

Web Title: what is internet
Next Stories
1 पीएचपी : महाजालाची भाषा
2 मायएसक्यूएल, ओरॅकल आणि मारियाडीबी
3 लॅम्प – महाजालाचे ओपन आर्किटेक्चर
Just Now!
X