देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात आणखी ११७ पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार ८७७ झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले १० हजार ४९१ जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार २५५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३१ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १२ हजार ८७७ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३५८ अधिकारी व ११ हजार ५१९ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार २५५ पोलिसांमध्ये ३०५ अधिकारी व १ हजार ९५० कर्मचारी आहेत.
करोनामुक्त झालेल्या १० हजार ४९१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ४१ व ९ हजार ४५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३१ पोलिसांमध्ये १२ अधिकारी व ११९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.