रायगड जिल्हय़ातील महामुंबई सेझ प्रकल्प रद्द झाला असला, तरी या प्रकल्पामुळे हेटवणे धरणातील सिंचन क्षेत्रात होणारी कालव्यांची कामे मात्र रखडली आहेत. या सेझ प्रकल्पासाठी कालव्याची कामे करू नयेत, असे जलसंपदा विभागाला सांगितल्याने गेली आठ वर्षे कालव्यांच्या कामासाठी आणलेले पाइप वापराविना पडून आहेत. त्यामुळे धरणातील सिंचनासाठी आरक्षित १४७ क्युबिक घन मीटर पाणी वापराविना पडून आहे.
पेण तालुक्यातील मळेघर गावात राहणारे हनुमान पाटील आज एका विचित्र अडचणीला सामोरे जात आहेत. त्यांच्या शेतात पाटबंधारे विभागाने महाकाय आकाराचे सिमेंट पाइप आणून टाकले आहेत. या पाइपमुळे पाटील यांना शेती करणे अशक्य झाले आहे. आठ वर्षांपूर्वी हेटवणे धरणाच्या डाव्या तीर (भूमिगत) कालव्यासाठी हे पाइप आणण्यात आले. कालव्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असे या वेळी त्यांना सांगितले गेले. पाइप ठेवण्याच्या मोबदल्यात चांगले भाडे देण्यात येईल, असेही पाटील यांना सांगण्यात आले. आज या घटनेला आठ वर्षे लोटली आहेत. पण कालव्याच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. वापरलेल्या जागेचे भाडेही त्यांना मिळालेले नाही. ज्या शेतात एकरी दोन खंडी भात उगवत होता त्याच शेतात सिमेंटचे जंगल पाहायची वेळ आल्याचे पाटील यांनी सांगितले. कालव्याची कामे तरी करा, नाही तर हे पाइप शेतातून उचला, अशी मागणी त्यांनी लोकशाही दिनात केली आहे.
पेण तालुक्यातील ५२ गावांतील शेती सिंचनाखाली यावी, तसेच पेण शहरासह येथील गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करता यावा यासाठी हेटवणे येथे धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. १९६४ मध्ये धरणासाठी पाहणी करण्यात आली. १९९५ मध्ये धरणाचे काम सुरू झाले. २००१ मध्ये हे काम पूर्ण झाले आणि प्रत्यक्ष पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. यानंतर सिंचनासाठी कालव्यांचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जवळपास १३ वर्षांनंतरही कालव्यांची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. सध्या धरणातील पाणी सिडकोमार्फत नवी मुंबई शहर आणि परिसरासाठी वापरले जाते. तर १४७ क्युबिक घनमीटर पाणी वापराविना पडून आहे.
पेण तालुक्यातील ५२ गावांतील ६ हजार ६०० हेक्टर शेतजमिनी ओलिताखाली यावी यासाठी उजवा तीर कालवा आणि डावा तीर कालवा टाकण्याचे नियोजित करण्यात आले होते. भूमिगत कालव्यांसाठी सिमेंटचे पाइपही आणण्यात आले होते. मात्र काम सुरू होणार तेव्हाच या परिसरात महामुंबई सेझसाठी भूसंपादन सुरू झाले. आणि कालव्यांच्या कामाला ब्रेक लागला. महामुंबई सेझमध्ये समाविष्ट गावांमध्ये कालव्याची कामे करू नका, असा फतवा, पाटबंधारे विभागाने काढला. आजा सेझ प्रकल्प तर रद्द झाला, मात्र जी तत्परता पाटबंधारे विभागाने कामे थांबवण्यात दाखवली, तीच तत्परता कामे सुरू करा असे सांगताना दाखवली नाही. याचा परिणाम आजही शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी काही मिळाले नाही.    
सेझ रद्द झाल्यावर शेतीला पाणी द्या, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. प्रा. एन. डी पाटील, आमदार धर्यशील पाटील यांनी यात पुढाकार घेतला. पेण ते मुंबई अशी पदयात्राही काढली. कालव्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र कालव्याची कामे वर्षभरानंतरही सुरू झाली नाहीत. वास्तविक पाहता तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्य़ातीलच होते. त्यांनी या कामात पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र शेतीसाठी कालव्यांची कामे करण्यापेक्षा त्यांना कोंढाणे आणि बाळगंगा धरणाच्या कामातच जास्त रुची असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे १४७ क्युबिक घनमीटर पाणी आणि हनुमंत पाटील यांच्या शेतात कालव्याच्या कामासाठी आलेले पाइपही पडून आहेत.    आता शेतातील पाइप तरी उचला नाही तर कालव्याचे काम करा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
हर्षद कशाळकर, अलिबाग