सातारा जिल्ह्यामध्ये काल रविवारी एकही करोनाबाधित निष्पन्न न झाल्याची बाब आनंददायी व समाधानाची ठरली असतानाच, आज सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत करोनाबाधित २२ रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ५३८ झाली. तसेच, कराडच्या कृष्णा रुग्णालयातून १९, तर सह्यद्री रुग्णालयातून ५ करोनाबाधित प्रकृतिस्वास्थ्यासह घरी परतले.

दरम्यान, संशयित तीन रुग्ण दगावल्याने या मृतांच्या घशाच्या स्त्रावाच्या चाचणी अहवालाकडे आरोग्य यंत्रणेसह लोकांच्या नजरा लागून राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध करोना काळजी केंद्रं व रुग्णालयांमध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या २२ जणांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले. तसेच, मुंबईहून आल्यानंतर गृहविलगीकरणात असलेल्या बोपेगाव (ता. वाई) येथील ८५ वर्षीय वृध्द महिला, सारीच्या आजाराने ग्रासलेली गिरवी(ता. फलटण) येथील ६५ वर्षीय महिला, कर्करोगाचा सामना करीत असलेला आणि मुंबईहून प्रवास करून आलेला ५२ वर्षीय इसम अशा तिघांचा आज मृत्यू झाला. या तिघांचेही मृत्यू पश्चात घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर व जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. आज दिवसभरात संशयित २३७ जणांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने नकारात्मक आले असून, अशाप्रकारे नकारात्मक अहवाल आलेल्या संशयितांची आजवरची संख्या ६,३९९ इतकी आहे.