20 October 2019

News Flash

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील २३ धरणे कोरडी

सद्य:स्थितीत राज्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

सांगे येथील बंधारा कोरडा पडला आहे.

राज्यात सध्या सरासरी १५ टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यात तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून, दुष्काळी परिस्थितीमुळे तब्बल २३ धरणे कोरडी झाली आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. औरंगाबाद, सोलापूर, नागपूर जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून पुणे जिल्ह्य़ातील धरणांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जलसंपदा विभागाचे प्रदेशनिहाय अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग आहेत. या प्रत्येक विभागातील पाण्याच्या स्थितीचा आढावा जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये फक्त तीन टक्के, नागपूरमधील जलाशयांमध्ये नऊ टक्के पाणी उरले आहे. तर, कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे ३७.३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ मेपर्यंत कोकणातील धरणांमध्ये ४३ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे कोकणातही यंदा आव्हानात्मक परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

औरंगाबाद विभागात धरणांची संख्या जास्त आहे. मात्र, गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे कोरडी पडली आहेत. या विभागात धरणांमध्ये तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागातील ९६४ धरणे आणि जलशयांपैकी आठ धरणांमध्ये शून्य टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी या विभागात १५ मेपर्यंत २४ टक्के पाणी होते.

नागपूर विभागात अवघा नऊ  टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत या विभागात १४ टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागात २४ मोठी आणि ५३ मध्यम धरणे असून ४९४ लघु प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी या विभागातील धरणांमध्ये २८ टक्के पाणी होते. यंदा हेच प्रमाणे १४.७१ टक्के एवढे आहे.

पुणे विभागात ३५ मोठी आणि ५० मध्यम धरणे असून ६४१ लघु प्रकल्प आहेत. पुणे जिल्ह्य़ात सध्या १६.१९ टक्के पाणीसाठा आहे. सोलापुरातील उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.

*  राज्यात लहानमोठी धरणे आणि लघु प्रकल्पांची संख्या तीन हजार २६७ आहे. त्यामध्ये १४१ मोठी आणि २५८ मध्यम धरणे आहेत. तर, दोन हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत.

* ही धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठय़ाचा आढावा जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यात सध्या सरासरी १५ टक्के पाणीसाठा आहे. तसेच २३ धरणे कोरडी पडली आहेत.

* गेल्या वर्षी १५ मेपर्यंत राज्यातील धरणांमध्ये २६ टक्के पाणीसाठा होता.

First Published on May 16, 2019 2:37 am

Web Title: 23 dams dry due to drought situation in the maharashtra