आदेशाच्या उल्लंघनाबद्दल नोटिसा

गोदावरी नदीपात्रात डाऊच खुर्द व बुद्रुक या दोन गावांच्या मधोमध असलेल्या कुराण टेकडीवर अडकलेल्या २३ रहिवाशांना अखेर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मदत मोहिमेद्वारे बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. हे २३ जण व धारणगाव कुंभारीलगतच्या एका वस्तीवरील ७ अशा ३० जणांना प्रशासनाचा आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल का करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. टेकडीला गोदावरीच्या महापुराने वेढा दिल्यानंतर या रहिवाशांनी येथून बाहेर पडण्यास नकार दिला होता.

गोदावरीचा महापूर गुरूवारी तिसऱय दिवशी ओसरला. त्यानंतर या टेकडीवरील २४ जणांना येथून बाहेर काढण्यात यश आले. मात्र सुमारे २५ जनावरे अजूनही टेकडीवरच असून, त्यांना शुक्रवारी येथून बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत खेडेकर यांनी दिली.

ही टेकडी नदीपात्रात उंचावर असून, टेकडीच्या पठारावर ६० एकर क्षेत्र आहे. टेकडीवर आदिवासी समाजीतल कुटुंबे राहतात. येथील जमिनी कसण्यासाठी त्यांना भाडेपट्टय़ाने देण्यात आल्या आहेत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही कुटुंबे या टेकडीवरच राहतात. सोमवारी दुपारपासून गोदावरीची पाणीपातळी वाढत गेली. तेव्हापासून प्रशासनाचा या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. मात्र, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी सायंकाळनंतर गोदावरीतील पाण्याची पातळी वाढून महापुराची चिन्हे दिसू लागली, तरीही हे लोक टेकडीवरून बाहेर आलेच नाहीत. अखेर गुरूवारी गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर नाशिक व पुणे येथून आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने रहिवाशांना बोटीने तीन खेपा करून बाहेर काढले. काही वृध्दांनी या पथकाला विरोध केला. मात्र, तो मोडून काढत या रहिवाशांना या टेकडीवरून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या.