राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील २४ तासांत २७९ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता ५ हजार ४५४ वर पोहचली आहे. सध्या १ हजार ७८ पोलिसांवर उपचार सुरू असुन, आतापर्यंत करोनामुळे ७० पोलिसांचा राज्यात मृत्यू झाला आहे.

करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.

देशभरात २४ तासांत करोनाचे २४ हजार २४८ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताने करोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी असलेल्या रशियाला मागे टाकले आहे. तसेच, देशात २४ तासांमध्ये ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १९ हजार ६९३ झाली आहे. करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ४ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीस देशभरात २ लाख ५३ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे.