पंढरपूर मार्गावरील जेऊर फाटय़ानजीकच्या अपघातात सात जखमी

पुणे : पंढरपूर-नीरा पालखी मार्गावर जेऊर फाटय़ानजीक रविवारी पहाटे दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. अपघातात फलटण येथील डॉक्टर सत्येन दोभाडा यांच्यासह मोटारचालक आणि तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

अपघातात डॉ. सत्येन हुकूमचंद दोभाडा (वय ४३, रा. मूळ रा. फलटण, जि. सातारा, सध्या रा. हडपसर), मोटारचालक आनंद गणपत चांडोले (वय ३७, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि अंजली अनिल भानवसे (वय ३, रा. वेळापूर, जि. सोलापूर) मृत्यू झाला. अपघातात सुरेश नारायण कांबळे, बापू रोहिदास कांबळे (दोघे रा. पुणे), सोमनाथ विठ्ठल मोहिते (वय ७), गणेश अप्पा लोखंडे (वय ७), दीपाली गणेश जाधव (वय २५), आशा अनिल भानवसे (वय २०), रंजना विठ्ठल मोहिते (वय ६०, सर्व रा. वेळापूर, जि. सोलापूर), सूरज कांबळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. डॉ. दोभाडा मूत्रविकार तज्ज्ञ होते. फलटणमध्ये त्यांचे रुग्णालय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-पंढरपूर मार्गावर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास जेऊर फाटय़ानजीक दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार बाळासाहेब बनकर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉ. दोभाडा, चांडोले, अंजली भानवसे यांचा मृत्यू झाला होता. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट दिली.

नीरा-जेजुरी अरुंद रस्ता

पुरंदर तालुक्यातील नीरेनजीक पिंपरेखुर्द ते जेजुरी रस्ता अरुंद आहे. दोन वाहने समोरासमोरून जात असताना तेथून वाहन पुढे नेणे अवघड होते. त्यामुळे या भागात वारंवार अपघात होतात. रस्त्याच्या कडेला असलेला भागात खडी न भरल्याने हा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून पालखी जाते.