नव्याने १३ रुग्ण दाखल

सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी करोनाबाधित १३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३४३ वर पोहोचली आहे. आज दोघांचा मृत्यू झाला असून यामुळे मृतांची संख्या २४ झाली आहे. दरम्यान, रुग्णालयात करोनावर यशस्वी मात करून बरे झालेल्या १०६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

या संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊ न करोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजना, प्रशासनाचे नियोजन यांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भरणे यांनी नव्याने सापडलेल्या सात रुग्णांची माहिती दिली. काल गुरुवारी सायंकाळपासून ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत करोनाशी संबंधित संशयित रुग्णांचे तपासणी केलेले अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३ अहवाल सकारात्मक आले. १२ एप्रिलपासून ते आतापर्यंत करोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्या ३४३ इतकी झाली आहे. यात २४ मृतांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाशी संबंधित ३५५५ रुग्णांची चाचणी घेण्यात आली असता त्यात ३२५५ चाचणी अहवाल नकारात्मक आले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात करोनावर यशस्वी उपचार घेऊ न बरे झालेल्या ११३ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

करोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असली, तरी नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा देताना पालकमंत्री भरणे यांनी, करोना रुग्णसंख्या वाढली तरी यशस्वी उपचार करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही उल्लेखनीय आहे. शहरात पाच ते सहा ठिकाणी करोनाबाधित रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊ न कठोर उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. प्रशासनाचे काम योग्य दिशेने चालू असून याकामी योग्य प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.