राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर चार कॉल आले. बंगला उडवून देण्याची धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिल्याचं वृत्त आहे. हे कॉल दुबईतून आले असून, त्या व्यक्तीनं दाऊदचा हस्तक असल्याचं कॉलवर सांगितलं. धमकीच्या फोननंतर मातोश्री परिसरात सुरक्षा वाढवण्यासाठी धावपळ सुरू झाली.

मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, कॉलची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेविषयी माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले,”अजून मी त्याची अधिकृत माहिती घेत आहे. पोलीस विभागाकडून याची माहिती घेत आहे. कुणी फोन केला, यासंदर्भात माहिती घेणार आहे. अधिवेशन असल्यानं सध्या मी प्रवासात आहे. या प्रकरणाची गृहविभागामार्फत यांची सविस्तर चौकशी करण्यात येईल. सत्यता पडताळण्यात येईल. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येईल,” असं देसाई यांनी सांगितलं.

धमकीच्या फोनवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “अशा पद्धतीच्या धमक्यांना घाबरणारं हे सरकार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं हे सरकार आहे. अतिशय मजबूतीनं काम करू. केंद्र सरकारनं दाऊदला परत आणून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करावं. अशा प्रकारच्या कुठल्याही धमक्यांना सरकार घाबरणार नाही,” असं चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर आपली भूमिका मांडली. “एकदर राजकारण कोणत्या स्तराला चाललेलं आहे, याचं हे लक्षण आहे. कारण ही हिंमत कुणी करू शकत नाही. धमकी दिल्याची हिंमत कुणी केली असेल, तर ते एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रातील जनता व आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत. कुणी त्यांना बोट लावू शकत नाही,” असं थोरात म्हणाले.