परवानगी नाकारली; डहाणू जेटीत उतरवण्याचा प्रयत्न
डहाणू : टाळेबंदीमुळे गुजरातमधील वेरावळ बंदरात अडकून पडलेले आणि चार दिवसांपूर्वी लहान-मोठय़ा पाच बोटींतून डहाणूपर्यंतआलेल्या ४०० खलाशांना डहाणू जेटीत उतरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने ते डहाणूत पोहोचूनही बोटीमध्येच अडकले आहेत. या खलाशांना डहाणू जेटीमध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यांतील आदिवासी मजूर, गुजरातमधील वेरावळ, सौराष्ट्र, मंगळूर, बंदरातील मच्छीमार बोटीवर खलाशी आठ महिन्यांसाठी स्थलांतरित झाले होते. ते टाळेबंदीमुळे गुजरातमध्ये अडकून पडले होते. जवळपास ७०हून अधिक बोटींतून सात हजार खलाशी डहाणू बंदरात उतरविण्यात आले, त्यानंतर त्यांची करोनासंदर्भात वैद्यकीय तपासणी करून, प्रत्येकाला त्यांच्या घरी पोहोचविण्यात येऊन त्यांना प्रशासनाने १४ दिवसापर्यंत कोणालाही न भेटण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी शेवटचा जथ्था आल्यानंतर, प्रशासनाने यापुढे कोणालाही डहाणू बंदरात उतरविले जाणार नाही,अशी सक्त ताकीद देऊन गुजरात बंदरातून येत असलेल्या तीन बोटी परत वेरावळ बंदराकडे परतवल्या होत्या. तरीदेखील चार दिवसांपूर्वी बोटी डहाणू समुद्रात आल्या. आणखी २५ बोटींतून खलाशी डहाणूला येणार असल्याची माहिती खलाशांनी दिली. मूळ मालकाच्या बोटी खलाशांना डहाणूत घेऊन येत नसून भाडय़ाने केलेल्या बोटीतून खलाशी परतत असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते जगदीश चौहान यांच्याकडून सांगण्यात येते.
टाळेबंदी आणि बोट वाहतूक बंदी कायद्यामुळे समुद्रात अडकलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील तब्बल सात हजार खलाशांना डहाणूत आणले गेले. त्यांना अलगीकरणाचा शिक्का मारून घरी सोडण्यात आले आहे. हे खलाशी आपल्या मूळ गावी गेले आहेत. मात्र अनेकांकडे प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने तसेच इतर बाबींसाठी ते बाहेर अनेकांच्या संपर्कात येत असल्याने साथीच्या आजाराचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सात हजार खलाशांना अलगीकरणाच्या कालावधीत नियंत्रित स्थळी ठेवणे आवश्यक आहे. अलगीकरण केलेल्या अनेकांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
– जगदीश चौहान, सामाजिक कार्यकर्ते
