गडचिरोलीतील ४३ गावे अद्यापही अंधारात

नागपूर : पूर्व विदर्भातील ४३ गावांत ३१ जुलै २०१८ पर्यंत वीज पोहोचवण्यात वीज कंपन्यांना अपयश आले आहे. ही गावे गडचिरोलीतील असून निधीअभावी महावितरणला २८ तर संथ कामामुळे महाऊर्जाला १५ गावांमध्ये विद्युतीकरण करता आले नाही. त्यामुळे गडचिरोलीतील आदिवासी पाडे व दुर्गम भागातील नागरिक आजही विजेपासून वंचित आहेत.

केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचवण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात डिसेंबर- २०१६ मध्ये ऊर्जा खात्याची बैठक घेत पूर्व विदर्भाच्या प्रत्येक गावात जुलै- २०१८ पर्यंत विद्युतीकरणाचे आदेश दिले होते. गडचिरोलीच्या जिल्ह्य़ात २६७ गावांत वीज नसल्याचे निदर्शनास आल्यावर २१८ गावांमध्ये महावितरण तर इतर ४९ ठिकाणी महाऊर्जाला निर्धारित वेळेत वीज उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दरम्यान, महावितरणला १९० गावांमध्ये वीज पोहोचवण्यात यश आले, परंतु महाऊर्जाला ४९ पैकी केवळ ३४ गावांमध्येच वीजपुरवठा करता आला.

महावितरणकडून त्यांच्या शिल्लक असलेल्या २८ गावांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी तेथील जिल्हा नियोजन समितीला निधीची मागणी करण्यात आली असून त्यानंतर ही कामे तातडीने केली जाणार असल्याचे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, तर महाऊर्जाकडून सौर ऊर्जाकरणाचे काम फार संथ असल्यामुळे कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.

नागपूर विभागीय कार्यालयाला विचारा- पुजारी

गडचिरोलीत महाऊर्जाचे काम चांगले आहे, परंतु महाऊर्जाकडून विद्युतीकरण न झालेल्या गावांबाबत मी बोलू शकत नाही. या विषयावर नागपूरच्या विभागीय कार्यालयाला विचारा, असे महाऊर्जाचे महाव्यवस्थापक (सौर विभाग) मुरारी पुजारी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. याबाबत नागपूर कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी लवकरच विद्युतीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले व याबाबत महाव्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगितले.