सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४५ हजार चाकरमानी दाखल झाले असून मालाड ते गुळदूवे असा प्रवास करणारा ३७ वर्षीय तरुण उपचारासाठी नेताना मृत्यू पावला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्वॅब तपासणी अहवालानंतर उघड होईल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मालाड ते गुळदूवे (ता.सावंतवाडी) असा प्रवास करणाऱ्या ३७ वर्षीय तरुण, पत्नी व मुलगा यांना गुळदूवे येथील प्राथमिक शाळेत विलगीकरणाखाली करण्यात आले होते. त्याला मंगळवारी रात्री श्वासोच्छवासाचा त्रास होऊ  लागला. म्हणून रूग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील एकूण १७ करोनाबाधित रुग्णांपैकी ७ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण २४ हजार ७५९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ४०९ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २४ हजार ३५० व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ५५२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार २९८ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १७ अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत १ हजार २८१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून २५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १०७ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ७१ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३६ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत  ५ हजार ८८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मेपासून एकूण ४५ हजार ४३६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.