सोलापुरमध्ये रविवारी पहाटे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाले आहेत. स्पर्धेला सुरुवात होताना आकाशात सोडण्यासाठी फुगे मागवण्यात आले होते. हे फुगवताना हायड्रोजन गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात फुगेवाल्यासह चार जण जखमी झाले आहेत. यात एक महिला आणि दोन शालेय मुलांचा समावेश आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे तिथे एकच गोंधळ माजला. परिणामी झालेल्या धावपळीत अनेक जण जखमी झाले आहेत.

सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने रविवारी पहाटे आंतरराष्ट्रीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हरिभाई देवकरण प्रशालेपासून सुरू झालेल्या २१ किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन स्पर्धेत केनिया व अन्य देशातील सुमारे साडेपाच हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस उपायुक्त बापू बांगर या मंडळींनीही या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला होता.

दरम्यान, या मिनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी एकाचवेळी हजारो खेळाडू धावणार, इतक्यात फुगे फुगविण्याच्या हायड्रोजन गॅस टाकीचा अचानक स्फोट झाला. या अपघातात चार जण जखमी झाले. शिवाय तेथील काही दुचाकींचेही नुकसान झाले आहे. गॅस टाकीचा स्फोट झाल्याचे दिसताच तेथे धावपळ झाली. दरम्यान रस्त्यावर खाली कोसळून अनेकजण जखमी झाले. स्फोटात भाजून जखमी झालेल्या चौघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.