आत्मा मालिक संकुलात ५०० खाटांचे करोना केंद्र उभारणार

कोपरगाव : दिवसेंदिवस कोपरगांवमधील करोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालेली आहे. करोनाच्या रुग्णांसाठी खाटा मिळेना तर कोणाला प्राणवायू देखील मिळेना त्या पाठोपाठ इंजेक्शन देखील मिळत नाहीये. रुग्णांना उपचार घ्यायचे तरी कुठे? हाही प्रश्न उपस्थितीत झाला. तालुक्यातील ही सर्वच परिस्थिती बघता अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी ५०० खाटा असलेले करोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसांतच आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कूल वसतिगृहात कोकमठाण या ठिकाणी करोना केंद्र सुरु होणार असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी आलेल्या करोना संकटापेक्षा या वर्षी आलेली करोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. करोनाला हद्दपार करण्यासाठी संजीवनी ने सुरुवातीपासूनच विविध उपाय योजना राबविलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना सुरक्षा साधणे वाटप, निर्जंतुकीकरण, मुखपट्टी, आरोग्य उपकेंद्रांना औषध फवारणीसाठी सोडियम हायपोचा पुरवठा, करोना रुग्णांना जेवण अशा विविध उपाययोजनांचा यात समावेश आहे. या शिवाय रिक्षा चालकांना किरणा वाटप, करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था, करोना महामारीबद्दल जनजागृती तसेच दोन रुग्णवाहिका नागरिकांसाठी विना मोबदला अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांपाठोपाठ आता आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल वस्तीगृह कोकमठाण या ठिकाणी ५०० खाटांचे करोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेऊन संजीवनीने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलले आहे. संजीवनीच्या निर्णयामुळे अनेक रुग्णांच्या गैरसोय टळणार आहे.

या करोना केंद्राच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता  कोल्हे आणि कोपरगांव तालुका औद्यौगिक वसाहतीचे अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेल्या आरोग्य सुविधेचा नागरिकांना संकट काळात करोना केंद्राचा मोठा आधार मिळणार आहे. नव्याने सुरु होणारे करोना केंद्राची पाहणी करण्यात आली. या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सचिन सूर्यवंशी, डॉ. संकेत पोटे, संजीवनी तोडकर या वेळी उपस्थितीत होते.