पाचशे रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्या तुटून पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. सांगलीतील विटा येथे हा प्रकार घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असून प्रात्यक्षिकही दाखवले. अनिल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० रुपयांच्या १४ नोटांच्या बाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. त्या रोजंदारीवर मोलमजुरी करतात. दीड महिन्यांपुर्वी त्यांना सात हजार रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी पाकिटात घालून कपाटात ठेवले होते. मिरच्या आणण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी बुधवारी त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढले आणि रुमालात बांधून बाजारात गेल्या. पण बाजारात गेल्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच ५०० ची एक नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी दुसरी नोट काढली असता ती नोट सुद्धा घडी पडताच तुटत असल्याचे आढळले. घाबरुन त्यांनी सर्व नोटा घडी करून पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसले.

यानंतर महिलेने अनिल राठोड यांच्याकडे जाऊन घडला प्रकार सांगितला. अनिल राठोड यांनी तपासून पाहिलं असता नोटांचे घड्या घालत तुकडे पडत असल्याचे त्यांनाही आढळून आले. अनिल राठोड यांनी तात्काळ विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संपर्क साधला. तिथे शाखा व्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अती उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला.

यासोबत आमच्या शाखेत आलेल्या करोडो रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात त्यांना काहीही होत नाही असंही सांगितलं. परंतु राठोड यांचे या उत्तरावरे समाधान झाले नाही. त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावी असा आग्रह केला. त्यानंतर अनिल राठोड यांना पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती ती बदलून देण्यात आली. परंतु उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही उत्तर दिले.

विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पुर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत असे शाखा व्यवस्थापक यांनी सुद्धा मान्य केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून अनेकांनी आपापल्या पाचशेच्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अथवा संबंधित यंत्रणेने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.