पावसाअभावी जलाशयांमध्ये फक्त सहा टक्के पाणीसाठा

मुंबई : जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ातही पावसाने दडी मारल्याने राज्यावर तीव्र पाणीसंकट घोंगावत आहे. जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या फक्त सहा टक्के पाणीसाठा आता शिल्लक असून, बहुतांश मोठय़ा धरणांनी तळ गाठला आहे. राखीव पाण्याचा साठा संपत आला असून, पाऊस आणखी लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होऊ शकतो.

जूनच्या अखेरीस नेहमी पाऊस सुरू झालेला असतो. मात्र यंदा पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणावर आटला आहे. राज्यात बुधवार सकाळपर्यंत ५.९६ टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता. गत वर्षी याच दिवशी जलाशयांमध्ये १६ टक्के पाण्याचा साठा होता. कोकण वगळता अन्य सर्व विभागांमध्ये पाण्याचा साठा एकदम कमी आहे. मराठवाडय़ातील जलाशयांमध्ये एक टक्काही साठा शिल्लक नाही. मराठवाडय़ातील बहुतांश सर्व जलाशयांमध्ये शून्य टक्के साठा  आहे. चार दिवसांपूर्वी मराठवाडय़ातील काही परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २२.५४  टक्के तर ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवीमध्ये १५.२१  टक्के साठा आहे. कोयना धरणात मात्र फक्त ५.७५  टक्के साठा शिल्लक आहे.

शून्य टक्के साठा असलेले जलाशय

जायकवाडी, मांजरा, तेरणा, सिना कोळेगाव, गोसीखुर्द,भंडारदरा, उजनी

विभागनिहाय साठा (टक्क्य़ांमध्ये)

* कोकण : २३.५९  * मराठवाडा : ०.४७

* अमरावती : ५.७७ * नागपूर : ५.५३

* नाशिक : ४.१८    * पुणे : ५.४४

भातशेतीला विहिरीचा आधार..

पावसाने ओढ दिल्याने विहिरींच्या पाण्यावर भातरोपे जगविण्याची वेळ रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर आली आहे. जून महिना संपत आला असला तरी जिल्ह्य़ात सरासरी पावसाच्या पाच टक्केही पाऊस झालेला नाही. ही परिस्थिती कायम राहिली तर भातपीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.