देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्धे म्हणून ज्यांचेकडे आपण पाहतो अशा पोलिसांना देखील करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये आणखी ७७ पोलिसांना करोनाचा संसर्ग असुन, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जीव देखील गमावावा लागला आहे.

याचबरोबर राज्यातली करोनाचा उपचार सुरू असलेल्या पोलिसांची संख्या १ हजार ३० वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता ५९ झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसेंदिवस करोनाची लागण झाल्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस दलात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. करोना लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवावे लागत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी त्यांना सतर्क राहावं लागत आहे. मात्र, आता त्यांना देखील करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे.

तर, महाराष्ट्र सरकार एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउनचा टप्पा संपत, मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

आणखी वाचा- मोठी बातमी: संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू

मागील चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे आणखी २१ जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, १८ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या ३०५ जवानांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत एकूण ६५५ जणांना करोनावर मात केली असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन : या नियमांचं करावं लागणार पालन

तसेच, मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण ५ लाख ४८ हजार ३१८ करोनाबाधितांमध्ये, सध्या उपचार सुरू असलेले २ लाख १० हजार १२० रुग्ण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ३ लाख २१ हजार ७२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.