करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. राज्यात दररोज ६५ हजारांपेक्षाही अधिक करोनाबाधित आढळून येत होते. मात्र आता मागील तीन आठवड्यात मुंबईतील अॅक्टिव्ह रूग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली दिसत आहे. तरी देखील राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्ण संख्या ही सरससरी ६० हजारांपर्यंत दिसून येत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचं मत जाणून घेण्याच प्रयत्न झाला. ज्यामध्ये ८४ टक्के नागरिकांना लॉकडाउनचे निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवले जावेत, असं वाटत असल्याचं समोर आलं आहे.

राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाउनचा कालावधी  १५ मे रोजी संपणार असून, या पार्श्वभूमीवर लोककल सर्कलने राज्यात सर्वेक्षण करून नागरिकांचं काय मत आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ८४ टक्के नागरिकाचं मत हे लॉकडाउनचे निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवावेत असं असल्याचं समोर आलं आहे. बहुतांश नागरिकांनी सूचित केलं आहे की, व्यवसायातील व्यत्यय आणि ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्वच वस्तूंच्या होम डिलिव्हरीची परवानगी असावी.

या सर्वेक्षणात राज्यातील १८ हजार जणांनी मत नोंदवलं. ज्यामध्ये ६६ टक्के पुरूष तर ३४ टक्के महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण महाराष्ट्रातील अधिकृत रहिवासी आहेत.