मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरांपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातही संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवस हे निर्बंध लागू राहणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व विभागांचे अधिकारी आणि आमदार यांची संयुक्त बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

रायगड जिल्ह्यात सुरवातीला पनवेल आणि उरण तालुक्यामध्येच करोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, टाळेबंदी शिथील झाल्यानंतर अलिबाग, पेण, खालापूर, कर्जत, रोहा, माणगाव, श्रीवर्धन तालुक्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आठ हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्याकरता पुन्हा एकदा टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. नागरीकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या टाळेबंदीच्या काळात रूग्णालये, दवाखाने, औषधाची दुकाने सुरु राहतील. भाजीपाला आणि फळ विक्री पुर्णपणे बंद राहील, बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील, दुध आणि वर्तमानपत्रांचे वितरण सुरु राहील. प्रक्रिया करणारे कराखाने, रासायनिक व औषध निर्मिती करणारे कारखाने सुरू राहतील. इतर कंपन्यांनी १० टक्के कामगारांच्या उपस्थितीत सुरु राहतील. या व्यतिरिक्त अगदी किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, मटण, मासळी विक्री तसेच मद्य विक्री देखील बंद ठेवण्यात येणार आहे. किरण मालाची घरपोच सेवा सरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

ई-पास असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही

रायगड जिल्ह्याच्या सर्व प्रवेशव्दारांवर तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. खारपाडा, खोपोली, ताम्हणी, कशेडी आदी ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. ई-पास असल्याशिवाय रायगड जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. ई-पास पोलिसांकडून देण्यात येतील. अत्यावश्यक कामाशिवाय तसेच मास्क न लावता फिरणार्‍यावंर कारवाई करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात करोनाची बाधा झालेल्या रूग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्व तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा असलेल्या किमान ५० खाटा वाढविण्यात येतील. ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये सुविधा वाढविण्यात येतील. कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात एक नियंत्रणकक्ष सुरू करण्यात येईल. तिथे जिल्हा पररिषद व महसूल विभागाचे कर्मचारी काम करतील. रूग्णाची माहिती मिळवून त्यानुसार त्यांना कुठे पाठवायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे, ही चिंतेची बाब असून करोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागत आहे. यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी  तटकरे यांनी केले.

वृत्तपत्र विक्री सुरु राहणार – पालकमंत्री 

वृत्तपत्र विक्री आणि दुध विक्री सुरु राहणार असल्याचे यावेळी पालकमंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, ठराविक वेळेतच याची विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक मालाची १५ जुलैपर्यंत खरेदी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.