जिल्ह्यात आज एकाच दिवशी करोनाचा संसर्ग झालेले ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक रुग्ण गडचिरोली शहरातील तर इतर ५ जण देसाईगंज तालुक्यातील आहेत. देसाईगंजमध्ये आढळून आलेल्यांमध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) एका जवानाच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

गडचिरोली शहरात करोनाचा संसर्ग झालेली ५८ वर्षीय व्यक्ती १७ जून रोजी कावीळ आजारावर उपचार करण्यासाठी गडचिरोली शहरातील खासगी दवाखान्यात भरती होता. त्यानंतर पुढील उपचारासाठी तो १९ जून रोजी नागपूरला गेला. तिथे त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. या रुग्णाला करोनाची लक्षणे नसून कावीळ व अन्य आजारावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. रुग्णाला करोनाचा संसर्ग कुठे झाला याबाबत माहिती घेणे सुरु आहे.

सध्या या खासगी रुग्णालयात आणि रुग्णाच्या संपर्कातील ३५ हून अधिक व्यक्तींना विलगीकरणात ठेवले आहे. दुसरे ५ रुग्ण देसाईगंज तालुक्यात आढळून आले आहेत. त्यात दोन महिला, एक मुलगी आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात होते. दोन्ही महिला वेगवेगळ्या दिवशी नागपूरहून आल्या होत्या. त्यातील एक महिला एक दिवस घरी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या तीव्र जोखमीच्या व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

देसाईगंजमध्ये एसआरपीएफ बटालियन दाखल झाल्यानंतर सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांपैकी एका जवानाचा नमुना पॉझिटिव्ह आला, तर उर्वरित जवानांचे निगेटीव्ह आले. या जवानाचे वडील व मुलगी दिल्लीहून आल्यानंतर त्यांचेही नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी ६ करोनाबाधित आढळून आल्याने आता जिल्हयातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६० वर पोहचली आहे. आत्तापर्यंत ४२ रुग्ण करोना आजारातून बरे झाले आहेत, तर १७ सक्रिय करोना बाधितांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.