दिल्लीतील आम आदमी सरकारचा मुख्य मार्ग भरकटला असून आपने अयोग्य निती अवलंबली असल्याचे योगगुरू रामदेवबाबांनी म्हटले आहे. तसेच आम आदमीने आपली ‘झाडू’ आता काँग्रेसच्या हाती दिली असल्याची टीकाही रामदेवबाबांनी यावेळी केली. ते नागपूर मधील एका कार्यक्रमात बोलत होते.
रामदेवबाबा म्हणाले, दिल्लीतील आम आदमी सरकारच्या उद्दीष्टांमध्ये बदल झालेला दिसतो ते आपल्या मूळ मार्गावरून भरकटले गेले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून संपूर्ण प्रशासन प्रणाली बदलण्याचा विचारचे केजरीवाल सरकार आहे. पण, त्यासाठी सरकारी तिजोरीतून किती खर्च होईल याची कल्पना त्यांना नाही असेही रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.
यावेळी नरेंद्र मोदींची स्तुतीसुमने उधळण्यासही रामदेवबाबा विसरले नाहीत. योगगुरू म्हणतात, मी यावेळी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी माझ्यावतीने पुरेपूर प्रयत्न करणार आहे. नवी दिल्लीत २३ मार्च रोजी होणाऱया माझ्या भव्य योगा शिबिरातूनही जनतेला नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.