दिगंबर शिंदे

सांगलीचे खासदार संजय पाटील यांची अलीकडच्या काळातील भाजपच्या कार्यक्रमात अनुपस्थिती आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशा जवळीक वाढल्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र पाटील यांनी ठामपणे भाजपशी एकनिष्ठ असल्याचा निर्वाळा देत या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. हा राजकीय विरोधकांचा अपप्रचार असल्याचे सांगितले आहे.

करोना संकटाशी संघर्ष सुरू असताना, गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीने शेतीला फटका बसला आहे. शासनाला जाब विचारण्याची विरोधक या नात्याने भाजपवर जबाबदारी असतानाही जिल्ह्य़ातील भाजपचे खासदार संजय पाटील मात्र तासगाव, यशवंत साखर कारखाने सुरू करण्यात आडकाठी येणार नाही यावरच लक्ष केंद्रित केले आहे. खासदार भाजपचे असले तरी त्यांची ऊठबस मात्र राष्ट्रवादी नेत्यांबरोबर जास्त आहे. यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खंबीर विरोधकाची उणीव जिल्ह्य़ाला आणि भाजपलाही भासत आहे.

गेल्या आठवडय़ात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बठक झाली. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सांगली दौरा झाला. यावेळी पक्षाचे खासदार यापासून अलिप्त होते.

मात्र मिरज तालुक्यात सलगरे येथे नुकत्याच भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या एका कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत आवर्जून उपस्थित होते.

खासदार पाटील यांचे सध्या प्राधान्य आहेत, ते तासगाव आणि यशवंत या दोन साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करणे. यापकी तासगाव कारखान्याची राज्य बँकेकडून सहा महिन्यांपूर्वीच ३४ कोटीला विक्री झाली असून पाच वर्षांपूर्वी यशवंत कारखान्याचीही विक्री झाली आहे. हे दोन्ही कारखाने खासदारांशी संबंधित कंपन्यांनी खरेदी केले आहेत. हे दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात अडचणी येऊ नयेत हाच हेतू खासदारांचा असावा अशी शंका घेण्यास वाव आहे. करोना संकट, अतिवृष्टी या प्रश्नावर संघर्ष करणे सद्य:स्थितीत कारखाना सुरू करण्यात विघ्न आणणारे ठरू शकते. यामुळेच खासदारांची सध्या तरी कोंडी झाली असून ते शरीराने भाजपचे असले तरी त्यांचे मन मात्र कारखान्यात गुंतले आहे. यासाठी पक्षाचा कार्यक्रम चुकला तर चालेल अशी त्यांची सध्या भूमिका दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये भाजपच्या उमेदवारीवर २०१४ मध्ये संजयकाका पाटील यांना खासदारकी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांना आव्हान दिले होते. आबांना आव्हान देत असताना भाजपमधील जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे राजेंद्र देशमुख, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे यांच्यासोबत दुष्काळी फोरमची स्थापना करून वेगळी चूलही मांडली होती. दरम्यानच्या काळात पालकमंत्री जयंत पाटील यांनी आबा-काका संघर्ष संपुष्टात यावा यासाठी विधान परिषदेचे सदस्यत्व देत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षही केले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्य़ात काँग्रेसला पर्यायाने वसंतदादा गटाची ताकद कमी करण्यासाठी जेजीपीचा प्रयोग केला गेला.

खासदार संजयकाका पाटील हे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. मात्र त्यांचा पक्षाच्या वरिष्ठांशी नित्य संपर्क आहेत. भाजपच्या माध्यमातून त्यांनी रखडलेल्या सिंचन योजनांना गती देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने सार्वजनिक कामासाठी अन्य पक्षांतील नेत्यांशी संपर्क साधणे यामध्ये गरअर्थ काढणे चुकीचे आहे.

– मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक, भाजप