महाराष्ट्र सदन आणि अन्य गैरव्यवहारांत राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह या विभागाचे माजी सचिव व राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्यासह १७ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर देशपांडे यांच्या औरंगाबादमधीर घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड हाती लागले. तब्बल १.५३ किलो सोने, २७ किलो चांदी आणि २ कोटी ६८ लाख रुपयांचे बाँड्स आणि ठेवी आढळून आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशपांडे शुक्रवारी दुपारनंतर फरार झाले. झडतीनंतर मिळालेल्या अपसंपदेच्या माहितीस औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून, अधिक तपशील देणे मात्र टाळले.
शहरातील स्नेहनगर शासकीय वसाहतीजवळच राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडे याचा आलिशान बंगला आहे. या घराच्या झडतीत पोलिसांना मिळालेली रक्कम आणि संपत्ती भुवया उंचावायला लावणारी आहे. औरंगाबाद शहराजवळ देशपांडे यांचे चार भूखंडही आहेत. देशपांडे यांचे चार लॉकर तपासण्याचे काम अद्याप बाकी आहे. सोमवारी ते पूर्ण होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्नेहनगरजवळील आलिशान बंगल्यावर एक रखवालदार वगळता रविवारी कोणीच नव्हते.
दीपक देशपांडे १९७४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. निवृत्तीच्या वेळी ते नियोजन विभागाच्या सचिवपदी कार्यरत होते. सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांनी विविध पदे उपभोगली. त्यांच्याकडे आढळून आलेली मालमत्ता आणि त्यांचे वैध उत्पन्न याचा मेळ घातला जाईल आणि त्यानंतर अपसंपदेचेही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे औरंगाबाद येथील निवासस्थानी नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या अन्यही आरोपींच्या घरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली आहे.

सोने, जमिनी, परकीय चलनही
दीपक देशपांडे यांच्या घरात तब्बल १.५३ किलो सोने, २७ किलो चांदी आणि २ कोटी ६८ लाख रुपयांचे बाँड्स आणि ठेवी आढळून आल्या आहेत.
’४ हजार ५४३ डॉलर, २ हजार ९६० पाऊंड्स, ४८५ युरो हे परकीय चलनही आढळून आले. विविध बँकांत ६८ लाख रुपये असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
’औरंगाबाद, पुणे आणि ठाणे येथे देशपांडे यांच्या सदनिका आणि बंगले आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात त्यांची ५ हेक्टर जमीनही आहे.

मराठे यांचेही बंगले
महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराशी संबंधित देवदत्त मराठे याचे नागपूर, नवी मुंबई येथे बंगले असून, ११६ ग्रॅम सोने आढळून आले आहे. बिपीन मुकुंद संखे याच्या घरातील छाप्यात केतन शहा यांच्या नावाची ६ कोटी किमतीच्या व्यवहाराची कागदपत्रे आढळून आली आहेत. त्याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

तीन दिवस छापे सुरू
महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात १२ जूनपासून छापासत्र सुरू होते. देशपांडे यांच्या घरावर दुपारी छापा टाकल्यानंतर सलग तीन दिवस छाप्याची कारवाई सुरूच होती. सार्वजनिक सुटी असल्याने काही बँकांमधील लॉकर उघडणे अजून बाकी आहे. अन्य अधिकाऱ्यांकडेही किती माया आहे, याचा शोध घेतला जात आहे.