News Flash

कमी दराने ज्वारी, मका खरेदी केल्यास बाजार समित्यांवर कारवाई

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा

संग्रहित छायाचित्र

शासनाने प्रथमच  यावर्षी रब्बी हंगामात ज्वारी आणि मका हमी भावाप्रमाणे खरेदीचा निर्णय घेतलेला असून जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात त्यानुसार खरेदी सुरू होईल. कमी भावाने खरेदी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

येथे करोना प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी पालकमंत्र्यांनी इतर विषयांवरही भूमिका मांडली. पाचोरा तालुक्यात लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना आणि त्यास नागरिकांची भक्कम साथ यामुळे पाचोरा तालुका हिरव्या क्षेत्रात येण्यास मदत होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी तहसीलदार कैलास चावडे यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी करोना परिस्थितीविषयी माहिती दिली.

पाचोरा रुग्णालयातील अपूर्ण कर्मचारी, तसेच उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपालिकेसाठी निधीची मागणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केली. पाचोऱ्यात रुग्ण वाढताच नागरिकांनी तालुक्यात स्वयंस्फुर्तीने संचारबंदी पाळल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील प्रत्येक नागरीक हा करोनाची साखळी तोडण्यासाठी काम करीत आहे. पोलिसांच्या मदतीला तालुक्यातील ७५ पेक्षा अधिक माजी सैनिक असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

बैठकीला आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, डॉ. भूषण मगर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, गटविकास अधिकारी विलास सनेर, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, किशोर बारावकर हेही उपस्थित होते.

भडगावातही आढावा बैठक

पाचोऱ्यातील बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी भडगाव येथेही आढावा बैठक घेतली. करोनाला रोखण्यासाठी भडगाव तालुक्यास लागणारी साधनसामग्री आणि औषधींची कमतरता भासू देणार नाही. भडगाव येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरीक आणि  कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयाने तालुक्यात अद्याप करोनाचा एकही रुग्ण नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी तहसीलदार माधुरी आंधळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक येरुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील, सुचिता पाटील आदींचे कौतुक केले. भविष्यात तालुक्यात करोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:11 am

Web Title: action on market committees for purchase of sorghum and maize at low rates abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
2 कुटुंबावर प्राणघातक हल्ला ;महिलेचा जागीच मृत्यू
3 मजुरांसाठी बससंख्या दुप्पट करण्याची मेधा पाटकर यांची मागणी
Just Now!
X