News Flash

चंद्रपूरमधल्या आदिवासी विदयार्थ्यांनी केला एव्हरेस्ट सर

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील 'सोनेरी क्षण'

माऊंट एव्हरेस्ट

‘आकांक्षांपुढे जिथे गगन ठेंगणे’ या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विद्यार्थ्यांना यश आले आहे. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत ‘मिशन शौर्य’ची आखणी केली. प्रधानसचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला. मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्समधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्यावतीने गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.

जुलै २०१७ पासून या विद्यार्थ्याचे प्रशिक्षण सुरु झाले होते. दार्जिलिंग, लेह लडाख या ठिकाणी या मुलांना प्रशिक्षकांकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात ११ एप्रिल रोजी हे विद्यार्थी मुंबईवरुन काठमांडुला रवाना झाले होते.

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे

मोहिमेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विदयासागर राव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विद्यार्थ्याना भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. या मोहिमेच्या ह्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या मोहिमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्नाके हेही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विदयार्थ्याची चढाई सुरू असून लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील .

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण- मंत्री विष्णु सवरा

आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर रोवण्यात आदिवासी विद्यार्थी- विद्यार्थ्यांना यश आले आहे. ही आनंदाची बाब असून आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी या चारही जणांचे अभिनंदन केले.

एवरेस्ट सर करणाऱ्या या चार विद्यार्थ्यांचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. शौर्य हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागाला या मोहिमेमुळे चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:31 pm

Web Title: adivasi children head on mount everest
Next Stories
1 कर्नाटक विभागवार जागा: अशाप्रकारे भाजप झाला सगळ्यात मोठा पक्ष
2 Wow! दिल्ली- अमेरिका प्रवास करा फक्त १३ हजार ५०० रुपयांत
3 यस सर, यस मॅम नाही…’जय हिंद’ बोलून लागणार शाळेत हजेरी, मध्य प्रदेश सरकारचा आदेश
Just Now!
X