नीरज राऊत लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा भागात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हत्याकांडात दोन साधू व त्यांच्या चालकाचे निर्घृण हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या प्रकारची अफवा गेल्या काही आठवडय़ापासून जोरात पसरली असताना त्यावर नियंत्रण आणण्यास किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास प्रशासकीय व्यवस्था अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याची समाजमाध्यमांवर पसरलेल्या चित्रफितीमधून दिसून येत असून घटनेचे गांभीर्य समजल्यानंतर पोलीस पुरेसा तयारीने का गेले नाहीत तसेच किमान हवेत गोळीबार का केला नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

१६ एप्रिलच्या रात्री सूरत येथे एका अंत्यविधीसाठी निघालेल्या या दोन साधूंना कासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गडचिंचले गावाजवळ गावकऱ्यांनी अडवले. ही महंत मंडळी वेशांतर करून आलेली चोर वा मूत्रपिंड काढण्यासाठी सक्रिय असलेल्या टोळीचे सदस्य असल्याच्या गैरसमजातून त्यांची मारहाण करण्यात आली. सुमारे तासाभराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या तिघांना पोलीस वाहनातून सुरक्षित लावण्याचा प्रयत्न करीत असताना प्रक्षोभक झालेल्या जमावाने पोलीस वाहनामध्येच नंतर निर्घृण हत्या करण्यात आली.

कासा पोलीस स्टेशनचे १८ पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी हजर होते. काही पोलिसांकडे शस्त्र असताना या महंतांवर हल्ला होत असताना त्यांच्या बचावासाठी पोलीस पुढे न येता त्यांनी बघ्याची भूमिका का घेतली, असा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी हवेमध्ये गोळीबार केला असता तर चारशे-पाचशेच्या जमावाला पांगवण्यास मदत झाली असती, असादेखील मतप्रवाह आहे. या हत्याकांडाला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

सुमारे दोन-तीन आठवडय़ांपासून वेशांतर करून चोरी व मूत्रपिंड काढण्यासाठी काही मंडळी ग्रामीण भागात फिरत असल्याची अफवा पसरली असताना त्या अनुषंगाने लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना राबविल्याचे दिसून आले नाही. जिल्ह्याच्या बाहेरून विनापरवाना येणाऱ्या मंडळींवर देखील पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे.

ही साधू मंडळी मुंबई येथून विक्रमगड मार्गे दाभाडी गावापर्यंत पोहोचताना त्यांना वाटेमध्ये अनेक चेकपोस्ट, तपासणी नाके व चौक्या लागल्या होत्या, परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना रोखण्यात आले नाही. यावरून पोलीस यंत्रणेतील ढिसाळपणा दिसून आला आहे. पोलिसांच्या लाठय़ा-काठय़ा या शहरी भागात मुक्तपणे वापरल्या जात असताना जिल्ह्याबाहेरील मंडळींच्या मुक्तपणे वावर करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास जिल्ह्यातील यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून आले आहे.

गुजरात राज्याकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गव्यतिरिक्त अनेक आडमार्ग असून अशा आडमार्गावर बंदोबस्त ठेवण्यास तसेच इतर जिल्ह्यातील वाहनांना प्रवेशबंदी करण्याससुद्धा जिल्हा नियंत्रण अपयशी ठरल्याचे या हत्याकांडावर दिसून येत आहे. एखाद्या गंभीर प्रकरणातील बंदोबस्तासाठी बाहेर जाताना पालघर जिल्ह्यातील पोलिसांकडे पुरेशा प्रमाणात शस्त्रसाठा व शस्त्र चालवण्यासाठी अपेक्षित प्रशिक्षण नसल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.