तालुक्याच्या पश्चिम भागातील चासनळी, मंजूर, हंडेवाडी, बक्तरपूर, वेळापूर, जेऊरपाटोदा, मुर्शतपूर, सुरेगाव, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी यासह दहा गावांना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मोठय़ा गारपिटीने प्रचंड झोडपून काढले. त्यामुळे शेतक-यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून गहू, हरभरा, ऊस, डाळिंब, द्राक्षे, चिकू, कांदे, ज्वारी आदी रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील नुकसान पाहून चासनळीच्या इंदूबाई काशिनाथ चांदगुडे (६०) या वृद्ध माहिलेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या गावांमध्ये सुमारे २५ मिनिटे गारपीट सुरू होती. त्यात फळबागांसह अन्य पिके होत्याची नव्हती झाली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सभापती मच्छिंद्र केकाण यांनी घटनास्थळास भेट देऊन नुकसानीची पहाणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकरराव पिचड, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी याबाबतची माहिती देऊन शेतक-यांना तात्काळ मदतीची मागणी केली. अनेक शेतक-यांच्या ओठावर तर दु:खाचा हंबरडाही फुटेनासा झाला आहे. तर जेऊरपाटोदा परिसरातील असंख्य विजेचे खांब उन्मळून पडले, त्यावरील पथदिवे फुटले. दीड ते दोन फुट उंचीच्या शेतात साचलेल्या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा चासनळी ते कारवाडी फाटय़ापर्यंत बसला आहे. वादळी वा-यासह पडलेल्या पावसानेही मोठे नुकसान झाले आहे.
गारांचा आकार लहान चेंडूसारखा होता. सायंकाळी उशिरापर्यंत तगारांचा खच साचून होता. चासनळी परिसरात गारा पडून गेल्या तरी तेथे काश्मीरसारखे प्रचंड दाट धुके निर्माण झाले होते. तालुक्यात यापूर्वी १३ जानेवारी ९६ ला गारपीट झाली होती. अनेकांच्या त्या आठवणी बुधवारी जाग्या झाल्या.