मजुरांना घेऊन जाणारी ट्रेन सुरू झाल्याचे वृत्त कानी पडताच चंद्रपूर येथील १५०० परप्रांतीय मजुरांनी आपल्याही जायची सोय करावी यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले. हे सर्व मजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या साईटवर काम करीत आहेत. यामुळे येथे काही काळासाठी तणावर निर्माण झाला होता.

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर पगलबाब नगर येथे ९५० कोटी रुपये खर्च करून ५० एकरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. मुंबईच्या शापुरजी पालनजी या कंपनीच्या माध्यमातून हे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड येथील कामगार मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत. कालपर्यंत येथे सुरळीत काम सुरू होते. पण दोन दिवसापासून मजुरांना घेऊन जाणारी विशेष रेल्वे तथा बस सुरू झाल्याचे वृत्त मजुरांचे कानी पडताच तेथील मजुरांनी गावाकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आणखी वाचा- गोंदियाला पोहोचण्यासाठी हैदराबादहून चालत पार केलं ४५० किमी अंतर, पण थकवा सहन झाला नाही आणि….

दरम्यान, आज सकाळी काम सुरू असलेल्या ठिकाणी १५०० मजुरांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आम्हाला गावाकडे जायचे आहे, असे म्हणून कामगार रस्त्यावर उतरले. ही माहिती जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कामगारांची समजूत घालण्यात आली. परंतू, कामगार ऐकायला तयार नव्हते. आम्हाला गावाकडं जायचं आहे असा आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी तहसीलदार घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

त्याचबरोबर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी करोनाकाळात मजुरांनी रस्त्यावर येणं दुर्दैवी असल्याचं सांगत टीका केली आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनानं या सर्व मजुरांची त्यांना स्वागृही पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्व मजुरांना सुखरूप पोहचविले जाईल अशी ग्वाही दिली.

आणखी वाचा- नाशिक : कामगारांना घेऊन जाणारी दुसरी रेल्वे उत्तर प्रदेशकडं रवाना; प्रवाशांनी दिल्या ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पर राज्यात असलेल्या विध्यार्थी, पर्यटक, मजूर आदींना नावं नोंदणीचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम आज नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली.