डीएमआयसीमध्ये विमान उभारणीचे कारखाने

देशात नागरी उड्डाण विभागामार्फत नव्याने एक हजार विमाने लागणार आहेत. अशी विमाने बनविण्याचे भारतीय कारखाने उभे राहावेत आणि त्यातील काही अशा दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात उभारले जातील, असे पाहू आणि त्यायोगे दीड लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नागरी उड्डाण विभागामार्फत ‘कार्गो’ धोरण ठरविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर संरक्षण व अन्य विभागात लागणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याच्या निर्मितीचे कारखानेही उभारले जातील. त्यातून मोठी औद्योगिक संधी उपलब्ध होईल, असे केंद्रीय उद्योग व नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू येथे सांगितले. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ऑरीक बिडकीनचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे यांची या वेळी उपस्थिती होती.

शेंद्रा आणि बिडकीन या दोन गावांभोवती दहा हजार एकर जमिनीवर औद्योगिक विकासाच्या हेतूने जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक प्रक्षेत्र विकासासाठी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने यासाठी ७ हजार ९४७ कोटी रुपयांच्या खर्चास पूर्वीच मान्यता दिली आहे. या औद्योगिक पट्टय़ात ‘ह्य़ोसंग’ या कंपनीकडून २३०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून एक हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होतील, असा दावा उद्योग विभागाने केला आहे. ऑरीक या उद्योगनगरीचे ऑरीक सिटी हॉल इमारतीचे काम डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण होईल, असे या वेळी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या विकासामुळे औरंगाबाद हे शहर येत्या पाच-सात वर्षांत वेगाने औद्योगिक प्रगती करेल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

या औद्योगिक पट्टय़ात उद्योग टाकणाऱ्या उद्योजकांना लागणारे ४२ टक्के पाणी पुनर्वापरातून उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी नागपूरच्या धर्तीवर पुनप्र्रक्रिया केंद्र उभे केले जातील. आवश्यकता असेल तेथे अन्य पाणीही उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उद्योगांना केवळ पुनप्र्रक्रियेचेच पाणी दिले जाईल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रम होता. त्याचा खुलासा त्यांनी केला. औद्योगिक पट्टय़ातील विकासासाठी नागरी उड्डाण विभागाकडून विमान बनविण्याचे भारतीय कारखाने आणता येतील का, याची चाचपणी केली जात आहे. त्याचबरोबर कार्गो धोरण आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या उद्योगामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा सुरेश प्रभू यांनी केला.

छायाचित्रकारास मारहाण

भूमिपूजन कार्यक्रमानंतर प्रकल्पाचे सादरीकरण व पत्रकारांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू व अन्य जण सभागृहात येताना पोलिसांनी छायाचित्रकार फेरोज खान यांना मारहाण केली. पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी केलेल्या या मारहाणीचा पत्रकारांनी निषेध केला. यामुळे सादरीकरणात मोठा गोंधळ उडाला. अखेर मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले, पुढच्या वेळी नियोजन नीट करा. पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांसमोर सांगितले.

  • शेंद्रा येथील ३ हजार १७९ हेक्टर जमिनीवर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.
  • बिडकीन येथील एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले.
  • ह्य़ोसंग कंपनीसाठी १०० एकराचा भूखंड.