कुंभमेळ्यात देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होणार असल्याचे लक्षात घेऊन हवाई कंपन्यांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रदीर्घ काळापासून हवाई नकाशावर येऊ न शकलेल्या नाशिकमध्ये सिंहस्थाच्या तोंडावर दोन खासगी कंपन्यांनी हवाई सेवेत रस घेतला. त्यातील मेहेर कंपनीने नाशिक-पुणे विमान सेवा सुरू केल्यानंतर पाठोपाठ व्यंकटेश एअरलाइन्स मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे सेवा सुरू करत आहे.

अनेकदा नाशिकला हवाई सेवा सुरू झाली. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करणे भाग पडले. दरम्यानच्या काळात १०० कोटी रुपये खर्चून नाशिकच्या ओझर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. टर्मिनल इमारत व प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधांची उपलब्धता करण्यात आली. एवढे करूनही बडय़ा विमान कंपन्या नाशिकला सेवा देण्यास तयार झाल्या नाहीत. कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर कमी प्रवासी क्षमतेच्या छोटेखानी विमानांद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्यांनी मात्र सेवा देण्यास पुढाकार घेतला आहे. पर्वणी काळात नाशिक येथे ८० लाख, तर त्र्यंबकेश्वर येथे ३० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यात देश-विदेशातील भाविक व पर्यटकांचाही समावेश राहील.
ही बाब लक्षात घेऊन पाच दिवसांपूर्वी मेहेर कंपनीने नाशिक-पुणे विमान सेवा सुरू केली. आठवडय़ातून तीन दिवस ही सेवा दिली जाणार असून उर्वरित दिवशी ‘जॉय राइड’चा आनंद दिला जाणार आहे. सिंहस्थ डोळ्यांसमोर ठेवून ‘जॉय राइड’ची कल्पना मांडण्यात आली.
मेहेरपाठोपाठ व्यंकटेश एअरलाइन्स कंपनी सोमवारपासून मुंबई-नाशिक, नाशिक-मुंबई तसेच पुढील टप्प्यात मुंबई-नाशिक-पुणे अशी सेवा सुरू करीत असल्याची माहिती कंपनीचे प्रमुख गणेश निबे व व्यवस्थापक हेमंत वाणी यांनी दिली.