20 January 2019

News Flash

शिर्डीप्रमाणे पंढरपुरात विमानसेवा सुरु करणार – शरद बनसोडे

सोलापूर येथील केंद्राची उडानसेवा बंद झाली नाही. काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा स्थगित केली आहे

खासदार शरद बनसोडे

तीर्थक्षेत्र शिर्डीप्रमाणे पंढरपूर येथे विमानसेवा सुरु करण्याचा प्रस्ताव संबंधित मंत्रालयाला सादर करणार असल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी येथे सांगितले.

बनसोडे म्हणाले, की पंढरपूर तीर्थक्षेत्री लाखो भाविक येतात. त्याच बरोबरीने केंद्र आणि राज्यातील मंत्री, उच्च अधिकारी, व्हीआयपी येत असतात. अशा वेळी ज्या पद्धतीने शिर्डीला विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर पंढरपूर येथे विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्रात पाठपुरावा करणार आहे. या बाबतचा एक प्रस्ताव संबंधित मंत्रालयाला तातडीने सादर करून आगामी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी केंद्रातील सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाची मदत घेवून विकास करणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले. माझ्या खासदारकीच्या तीन वर्षांच्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेटी दिल्या. मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिलो असे सांगत बनसोडे म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत विविध उपचारांसाठी पीडित रुग्णांना प्रधानमंत्री आरोग्य योजने अंतर्गत जवळपास १६ कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला भेटी दिली असून विविध कामे पूर्ण केली आहेत. मंगळवेढा येथील ३५ गावांपैकी १६ गावांना म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी दिले आहे.

सोलापूर विमानसेवा लवकरच

सोलापूर येथील केंद्राची उडानसेवा बंद झाली नाही. काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा स्थगित केली आहे. मात्र सोलापुरातील उडान सेवा लवकरच सुरु होईल, असा विश्वासही बनसोडे यांनी व्यक्त केला.

प्रसिद्धीपेक्षा काम महत्त्वाचे

आपली कामे सर्वत्र सुरू असताना त्याची प्रसिद्धी आपण का घेत नाही, असे पत्रकारांनी विचारता बनसोडे म्हणाले, की प्रसिद्धीसाठी मी ही कामे करत नाही. आगामी निवडणुकीवेळी लोकांपुढे पुन्हा मला जावयाचे आहे. केवळ प्रसिद्धीत राहणाऱ्या शिंदे साहेबांनी माझ्याविरुद्ध यंदा पुन्हा निवडणूक लढवावी. जनता त्यावेळी प्रसिद्धीपेक्षा या कामाचा विचार करेल.

First Published on January 14, 2018 3:34 am

Web Title: airlines will start in pandharpur says sharad bansode