महाराष्ट्र सरकार लोकांची फसवणूक करण्यात माहीर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही या भाजपने फसवणूक केली असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. नारायण राणेंची अवस्था तर ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. असाही टोला त्यांनी लगावला. नांदेडमधील माहूर या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरु आहे त्यावेळी त्यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवत भाजपवर निशाणा साधला.

भाजपने नारायण राणेंना गाजर दाखवले, भाजपचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर ठेवले पाहिजे असाही खोचक सल्ला अजितदादांनी दिला. या सरकारने फक्त लोकांच्या कानाला बऱ्या वाटतील अशा घोषणा दिल्या. निर्लज्ज आणि अकार्यक्षम सरकार पायउतार झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्याचसोबत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. बेळगाव येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील कन्नडमध्ये गाणे म्हणतात, सीमा प्रश्न एवढ्या वर्षांपासून चिघळला आहे हे माहित असूनही चंद्रकांत पाटील यांनी केलेले वर्तन निषेधार्ह आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार करतो आणि त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही करतो असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचाही अजित पवारांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. जानकरांना त्यांच्या खात्यातले काहीही कळत नाही असे म्हणत त्यांनी टीका केली. नारायण राणे आणि महादेव जानकर अजित पवारांना या टीकेवर काय उत्तर देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांचे भव्य स्वागत झाले हे स्वागत म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. २०१९ मध्ये जनता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वागत करेल असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. संपूर्ण राज्यात आता विचारांची लाट आहे असेही मत त्यांनी मांडले. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारे सरकार उलथवून टाकण्याचे बळ आम्हाला दे असे साकडे आम्ही माहूरच्या रेणुका मातेला मागितले असल्याचेही तटकरे यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.