अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पाचही नगरसेवकांनी घरवापसी केली. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी घेण्यात आलेल्या निर्णयाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांना पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “”मी त्या दिवशी बारामतीत होतो. त्या दिवशी गर्दीत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीत काही वाहनं आली. तिथे नीलेश लंके तिथे आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे. त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते. मग ती त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीनं घेतलं नाही, तर भाजपात जाणार. आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी नीलेश लंके यांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं.

“त्यानंतर त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पाठवलं. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल, वा म्हणण असेल तर तुमचे वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगितलं. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही ते बोलले नाहीत. माध्यमांनीच ते नाराज असल्याचं दाखवलं,” असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on five shivsena corporator bmh
First published on: 09-07-2020 at 14:22 IST