News Flash

अर्णब गोस्वामींच्या चौकशीला न्यायालयाचा हिरवा कंदील

तळोजा कारागृहात दररोज तीन तास चौकशीची परवानगी

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली.

दरम्यान, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.

अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी (७ नोव्हेंबर) संपली. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. आम्ही अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 7:00 pm

Web Title: alibag sessions court allows police to question arnab goswami for 3 hours daily in taloja prison msr 87
Next Stories
1 चिमुकल्यांसाठी स्पर्धा : घरातूनच होऊ शकता सहभागी
2 काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये – अनिल परब
3 राज्यपालांनी अर्णबपेक्षा नाईक कुटुंबाची काळजी करावी – नवाब मलिक
Just Now!
X