‘गोपीनाथगड’ उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्ह्य़ात आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे हेलिकॉप्टर सुरक्षा यंत्रणा व कंपनीतील गोंधळामुळे ऐन वेळी नियोजित हेलिपॅडऐवजी अर्धा किलोमीटर अंतरावरील दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले. मात्र, तेथे कोणीच नसल्याने शहादेखील अवाक झाले आणि दहा मिनिटे हेलिकॉप्टरमध्येच बसून राहिले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तत्काळ गाडी घेऊन हेलिपॅडकडे धाव घेतली व शहा यांना त्यांच्या इंडिगोतून कार्यक्रमस्थळी आणले. मात्र, एकूणच या प्रकाराने शहा चांगलेच संतप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच या घटनेची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेतली गेली. अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी थेट बीड गाठून या प्रकरणी चौकशी सुरू केली. त्यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ परळीत उभारलेल्या गोपीनाथगडाच्या शनिवारी पार पडलेल्या उद्घाटनास अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्यातील १८ मंत्री, १० खासदार, अनेक आमदार उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उच्चपदस्थ येणार असल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात दोन, व्यासपीठाच्या बाजूला, वैद्यनाथ ग्राहक भांडारच्या मागे दोन, तर परळी तहसीलसमोर व औष्णिक विद्युत केंद्र परिसरात प्रत्येकी तीन असे दहा हेलिपॅड तयार करण्यात आले होते. कोणत्या नेत्याचे हेलिकॉप्टर कोणत्या वेळेला व कोणत्या हेलिपॅडवर उतरणार, त्यानुसार गाडय़ा व बंदोबस्तही निश्चित करण्यात आला होता.
शहा यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर ग्राहक भांडारच्या मागे चार क्रमांकाच्या हेलिपॅडवर उतरणार होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक पारसकर हे शहा यांच्यासाठीची बुलेटप्रूफ स्कॉíपओ गाडी, सुरक्षा ताफा घेऊन नियोजित हेलिपॅडवर उभे होते, तर स्वागतासाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर पक्षाचे नेतेही हजर होते. मात्र, बाराच्या सुमारास आकाशात हेलिकॉप्टर घिरटय़ा घालून अचानक अध्र्या किलोमीटर अंतरावर वैद्यनाथ कारखाना परिसरातील एक नंबरच्या हेलिपॅडवर उतरले. ही बाब पोलीस अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेतली, तर हेलिकॉप्टर खाली उतरल्यानंतर तेथे कोणीच नसल्याने शहा दहा मिनिटे तसेच बसून राहिले. तोपर्यंत अधीक्षक ताफ्यासह पोहोचले आणि शहा यांना त्यांच्या इंडिगोतून घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचले. सुरक्षा यंत्रणेतील या गोंधळाने शहा मात्र चांगलेच संतप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकूणच या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी थेट बीड गाठून संपूर्ण माहिती घेतली, तर गोपीनाथगड येथे जाऊन नियोजित हेलिपॅड व ज्या हेलिपॅडवर उतरले, त्यातील अंतर व इतर बाबींची तपासणी केली.
चौकशीत जिल्हाधिकारी कार्यालयाने शहा यांच्या हेलिकॉप्टरची जागा बदलल्याची माहिती संबंधित कंपनीला आदल्या दिवशी शुक्रवारी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी देण्यात आली होती. मात्र, ही माहिती हेलिकॉप्टरच्या पायलटपर्यंत पोहोचली नसल्याने सकाळी गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात नेमका दोष कोणाचा, या बाबत कसून चौकशी केली जात आहे. साहजिकच थंडीतही प्रशासकीय यंत्रणेला घाम फुटला आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे दोघेही सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.