माहिती अधिकार कायदा कमजोर करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने संसदेत विधेयक मांडून कायद्यात बदल केला असून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे  दिला. कायद्यातील बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका  असून त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचे हजारे म्हणाले.

माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असे बंधन आहे. परंतु कायदा तयार होऊन १४ वर्षे झाली तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कायद्यामध्ये आपल्या फायद्यासाठी बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारचा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असे ते म्हणाले.