राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल. मुंबईतील युनिटची संख्या वाढविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित कायद्यात सुधारणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. राज्यात अंमली पदार्थाची विक्री कुरिअर व पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात सदस्य अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते.

डॉ.पाटील म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालवणे, दोन वर्षाची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षाची शिक्षा २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३ रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत आझाद मैदान, वरळी, बांद्रा, घाटकोपर व कांदिवली हे पाच युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. तसेच विशेष पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.

मंगळवेढ्यात इतर राज्यातून येणाऱ्या अंमली पदार्थासंदर्भात चेक नाक्यावरील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल आणि जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मानखुर्द व शिवाजीनगर येथील अल्पवयीन बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहितीही डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.