04 March 2021

News Flash

विद्यापीठ नामांतर वादामागे भाजपमधील सत्तासंघर्ष

शहकाटशहाच्या राजकारणाला जोर

सोलापूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती; शहकाटशहाच्या राजकारणाला जोर

सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे यावरून सध्या सामाजिक वातावरण गढूळ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यकर्त्यांनी वेळीच तोडगा न काढल्यास मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराप्रमाणेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. नामांतराच्या मुद्दय़ाला विविध कंगोरे असून, सत्ताधारी भाजपमधील सत्तासंघर्षही तेवढाच कारणीभूत ठरला आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा विषय चांगलाच गाजला होता. त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. नामांतराच्या विरोधात वातावरण तापविण्यात आले. मराठवाडय़ात शिवसेनेचा जम बसण्यात विद्यापीठ नामांतराचा मुद्दा फायदेशीर ठरला होता. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून मागणी करणाऱ्यांनी आंदोलन पुकारले असता विरोधातही आंदोलन झाले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून सवर्ण विरुद्ध दलित अशी दरी निर्माण झाली. विरोध डावलून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या नावात मराठवाडा हा शब्द कायम राहावा, असा तोडगा काढण्यात आला. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला. नामविस्ताराचा निर्णय घेऊन शरद पवार यांनी सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला, पण त्याची त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली. १९९४ मध्ये नामविस्तार करण्यात आला आणि १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मराठवाडय़ात तेव्हा शिवसेना आणि भाजप युतीला जास्त जागा मिळाल्या होत्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा होता, पण त्याची किंमत मोजावी लागल्याची भावना नंतर शरद पवार यांनीही बोलून दाखविली होती.

राज्यातील फक्त एका जिल्ह्य़ापुरत्या मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सध्या चिघळला आहे. दोनच दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोलापूमधील कार्यक्रमात धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे म्हणून पत्रके फेकण्यात आली. सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली त्या वेळी सुरुवातीलाच या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यापैकी एकाचे नाव द्यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली होती.  विद्यापीठाला सिद्धेश्वर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबरोबर माता जिजाऊ यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आल्याने  सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. त्यातच कोणीही माघार घेण्यास तयार नाही. लिंगायत समाज सिद्धेश्वर, धनगर समाज अहिल्याबाई होळकर तर मराठा समाजाने माता जिजाऊ यांच्या नावाची मागणी केली आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरचा मुद्दा जेव्हा विद्यापीठाच्या विद्या परिषदेकडे समतीसाठी गेला होता तेव्हा  २८ संघटनांनी विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला, तेव्हा एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेता २००८ साली विद्या परिषदेने नामांतराच्या मुद्दय़ावर सावध भूमिका घेत, विद्यापीठाला सिद्धेश्वर, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर व अन्य कोणाचेही नाव देता सोलापूर हे मूळ नाव कायम ठेवण्याचा ठराव संमत करून शासनाकडे पाठविला होता.

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीच्या आडून राजकीय कुरघोडय़ा किंवा जुने हिशेब चुकते करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप अंतर्गत सोलापूर जिल्ह्य़ात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजय देशमुख यांच्यात शीतयुद्ध सुरू असते. लिंगायत समाजातील पालकमंत्री देशमुख हे सिद्धेश्वराच्या नावासाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपमधील पालकमंत्र्यांच्या विरोधातील गट राजकीय वातावरण पेटेल अशा पद्धतीने व्यूहरचना करीत असल्याची चर्चा आहे.

सोलापूरच्या राजकारणाचा आढावा घेतल्यास शहरात लिंगायत समाजाची नाराजी ओढवून घेणे कोणत्याच राजकीय पक्षाला सोयीचे ठरणार नाही. जिल्ह्य़ात धनगर समाजाची लक्षणीय संख्या लक्षात घेता या समाजाला कोणी दुखवणार नाही. अशा वेळी राजकीय वातावरण तापणार नाही, अशा पद्धतीने पावले टाकणे आवश्यक आहे. पण सध्या हा विषय वेगळ्या वळणावर नेण्याची भाषा केली जात आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरच्या वादाची पाश्र्वभूमी लक्षात घेता सर्व राजकीय नेत्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

नामांतराचा वाद हाताबाहेर जात असल्यास सोलापूर हेच नाव कायम ठेवले जाईल, असे सरकारने जाहीर करावे, असे मत काही जाणकरांनी मांडले आहे. सामाजिक वातावरण गढूळ होणार असल्यास सहमती घडवून आणणे हे साऱ्यांचे काम आहे. पण सारेच नेते आपला स्वार्थ साधत असल्याचे चित्र आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 2:39 am

Web Title: articles in marathi on solapur university name issue
Next Stories
1 कृषी कर्जमाफीची डोकेदुखी
2 भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबल्याने राणेंची समांतर काँग्रेस?
3 पतंजलीच्या नावाखाली फसवणूक
Just Now!
X