गणेशोत्सवाला जेमतेम काही दिवस  उरले आहेत . परंतु यंदाच्या  उत्सवावर करोनाचे सावट आहे. पारंपरिक मूर्तीकारांबरोबरच खास पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणाऱ्या कलाकारांनाही याचा फटका बसला आहे . अलिबागजवळच्या सागाव येथील संतोष थळे हे देखील कागदांच्या बोळ्यापासून १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतात. परंतु करोनामुळे त्यांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत .

कागदाचा बोळा आणि खळ एकत्र करून साच्यात भरायचे आणि त्यातून ही गणेशमूर्ती साकारली जाते . महत्वाचे म्हणजे मूर्ती रंगवण्यासाठी ते जलरंगांचा वापर करतात. गेली अनेक वष्रे ते कागदाच्या बोळ्यांपासून अशा गणेशमूर्ती तयार करताहेत . पेशाने शिक्षक असलेले थळे यांना शैक्षणिक साहित्य तयार करण्याची सुरूवातीपासूनच आवड आहे. त्यातूनच बाहुल्या तयार करता करता  त्यांना कागदापासून गणेशमूर्ती तयार करण्याची कल्पना सुचली . त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही अशा सुबक सुंदर रेखीव गणेशमूर्ती आकार घेवू लागल्या. महत्वाचे म्हणजे या मूर्ती रंगवण्यासाठी जलरंगाचा वापर करण्यात येतो .

सुरूवातीला केवळ छंद म्हणून अशा मूर्ती तयार करत असतानाच हळूहळू लोक त्यांच्यांकडे गणेशमूर्तीची मागणी करू लागले . वजनाला अतिशय हलक्या असल्याने हाताळायला सोप्या . त्यामुळे मुंबई पुण्यातून त्यांच्या  गणेशमूर्तीना मागणी येवू लागली त्यांचा हुरूप वाढला. यंदाही मुंबईतील कांदिवली येथील पर्यावरण संस्थेकडून तसेच पुण्यातून ऑर्डर्स आल्या  होत्या.  परंतु क रोना आणि लॉकडाऊनमुळे या सर्व ऑर्डर रद्द झाल्या. आज त्यांच्याकडे १०० हून अधिक कागदाच्या गणेशमूर्ती तयार आहेत. परंतु मागणी कमी झाली आहे. यामुळे संतोष थळे यांच्यातील कलाकार काहीसा हिरमुसला आहे . आता त्यांची भिस्त केवळ स्थानिक भाविकांकडून येणाऱ्या मागणीवरच आहे .विघ्नहर्त्यांच्या मूर्तीकारावरच हे विघ्न ओढवले आहे. त्याामुळे बाप्पानेच करोनाच्या विळख्यातून अख्याजगाला सोडवावे एवढीच प्रार्थना करणे हातात आहे

लॉकडाऊनच्या काळात खरंतर आम्हाला ही संधी मिळाली, तिचं सोनं केल, वेळेचा सदुपयोग केला . आपल्याकडे गणेशमूर्ती तयार आहेत, लोकांची मागणी आहे  बुकिंगसुद्धा केलं आहे. परंतु त्यांची शहरे, गावे लॉकडाऊन असल्याने त्यांनी बुकिंग रद्द केली आहेत.

–    संतोष थळे  मूर्तीकार