एसआरपीचा जवान जखमी

संगमनेर : गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची घटना संगमनेरमध्ये घडली. या वेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाकडून मारहाण देखील करण्यात आली. जमावाच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी पोलिसांना पळ काढावा लागण्याची नामुष्की ओढवली. तेथील अडथळे रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकून त्याचे नुकसान करण्यात आले. मारहाण व हल्लय़ात एसआरपीचा एक जवान किरकोळ जखमी झाला आहे.

काल सायंकाळी सातच्या सुमारास दिल्ली नाका परिसरातील मोगलपुरा भागात पोलिसांना मारहाण करण्याचा हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी जुबेर हॉटेलवाला, या हॉटेलमधील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हमीद रशीद शेख, अरबाज साजिद शेख व अनोळखी जमावा विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. इतर संशयितांची आज दिवसभर झाडाझडती चालू होती. त्यासाठी या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

या घटनेने संगमनेरध्ये खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरला भेट दिली. याबाबतची अधिक माहिती अशी की, रमजानचा महिना सुरू असून रोजा सुटण्याच्या वेळी दररोज शहरातील मुस्लीमबहुल भागात मोठी गर्दी होत असते. मोगलपुरा परिसरात गर्दी झाल्याने पोलीस तेथे गेले होते. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला. एका पोलिसाला या वेळी मारहाण देखील झाल्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

सामाजिक अंतर न पाळणे, मास्कचा वापर न करणे आदी कारणांवरून पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आपल्याच भागात येऊन आपल्याला पोलीस बोलत असल्याचा राग आल्याने पोलिसांवर हल्ला करत वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तेथून काही अंतरावर असलेल्या दिल्ली नाका परिसरात नाक्यावरचे अडथळे  फेकून दिले. उन्हापासून बचावासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली राहुटी देखील जमावाने फेकून दिली. जमाव मोठय़ा संख्येने असल्याने मारहाण होत असताना पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या तावडीतून पळ काढावा लागला.

शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अहमदनगर मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सलमान मुख्तार शेख यांच्या फिर्यादीवरून निष्पन्न झालेल्या सहा आरोपींसह अन्य १५ जणांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना दुर्दैवी – थोरात

पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. असे घडायला नको होते. प्रशासन अथवा पोलीस यंत्रणा नागरिकांच्या हितासाठी व त्यांच्या आरोग्यासाठीच काम करत आहे, याचे भान ठेवायला हवे. पोलीस त्यांचे कर्तव्य करत असताना अशी वागणूक देणं अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे गुन्हेगार कोणीही असो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी पुढील कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.