वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये सातारा ते लोणंद प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेमध्ये अल्पवयीन  मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. एवढच नाही तर या मुलीने आरडाओरडा केला म्हणून तिला आरोपीने रेल्वेतून बाहेर फेकल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अखेर, या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान आदर्की गावच्या हद्दीत रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस रात्री दीड वाजेच्या दरम्यान सातारा रेल्वे स्थानकावर येते. येथून पुढे लोणंदकडे जात असताना वाठार स्टेशन ते लोणंदच्या दरम्यान बर्थवर कुटूंबियांसोबत झोपलेल्या मुलीला अज्ञात प्रवाशाने उचलून बाथरूम मध्ये नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मी तुला आई-वडिलांकडे सोडतो असे सांगून बाहेर आणून दरवाजातून खाली ढकलून दिले. वाठार ते लोणंद दरम्यान आदर्की घाटामध्ये गाडीचा वेग कमी झाल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

ही मुलगी कुटुंबियांसह आपल्या घरी दिल्लीकडे जात होती. दरम्यानच्या काळामध्ये संबंधित प्रवासी या डब्यांमध्ये घुसला व त्याने मुलीला उचलून हा तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. सकाळी साडेसात – आठ वाजेच्या दरम्यान आदर्की येथील ग्रामस्थांना ही मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

रेल्वे पोलिसांनी त्यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक प्रज्ञा सरोदे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर सरोदे यांनी वेगवान हालचाली करत दिल्ली मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकं व डब्यांमध्ये पोलीस पाठवून तपास मोहीम राबविली. मुलींने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सुरुवातीला २० लोकांना जळगावमध्ये ताब्यात घेण्यात आले, यानंतर चार लोकांमधून या आरोपीची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो झाशी येथील मुख्यालयाच्या सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून साताऱ्याकडे त्याला आणण्यात येत असल्याचे सातारा रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रवासादरम्यान रेल्वे पोलीस व कोणत्या टीसीची नेमणूक येथे होती याची माहिती घेतली जात आहे. पुणे लोहमार्ग अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांनी ही माहिती दिली.